दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमने आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. विक्रमने आजपर्यंत ‘अनियान’ (अपरिचित) आणि ‘आय’ सारख्या अनेक सिनेमांसाठी आपल्या शरीरयष्टीत लक्षणीय बदल केले आहेत. नुकत्याच आलेल्या ‘थंगलान’ सिनेमासाठीही त्याने पुन्हा एकदा आपल्या शरीरावर खूप मेहनत घेतली. एका मुलाखतीत विक्रमने या बदलांबाबत खुलासा केला आहे. अशा शारीरिक बदलांमुळे कधीकधी गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. तरीही, अशा आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी तो या प्रक्रियेचा आनंद घेतो, असं त्याने म्हटलं आहे.
चियान विक्रमने त्याच्या भूमिकांसाठी केलेले शारीरिक बदल, त्या प्रक्रियेची आव्हाने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यामागील प्रेरणा याबद्दल पिंकविलाशी संवाद साधला. विक्रम म्हणाला, “हे माझं अभिनय आणि सिनेमाप्रती असलेलं प्रेम आहे. मला नेहमीच साचेबद्ध काम न करता काहीतरी वेगळं करायचं आहे. मी दारू पित नाही किंवा सिगारेट ओढत नाही, पण माझं आयुष्यच माझ्यासाठी नशा आहे. मी जेव्हा अभिनय करतो तेव्हा मला त्यात खूप आनंद मिळतो. मी त्यात धुंद होऊन जातो.”
हेही वाचा…“… अन् मी दोन महिने रोज रडत होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “मला अचानक…”
विक्रमने सांगितलं की, भूमिकांसाठी शारीरिक बदल करताना अनेकदा त्याच्या शरीरावर कायमस्वरूपी गंभीर परिणाम होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ‘कासी’ सिनेमात विक्रमने अंध गायकाची भूमिका साकारली आहे. यानंतर विक्रमला दोन-तीन महिने व्यवस्थित दिसत नव्हतं, कारण त्याच्या पापण्या सतत उघड्या होत्या. यामुळे त्याच्या दृष्टीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला होता. ‘आय’ सिनेमासाठी विक्रमने वजन खूप कमी केलं होतं. त्याने ८६ किलोवरून ५२ किलोपर्यंत वजन घटवलं होतं. विक्रम म्हणाला, “मला वजन ५० किलोपर्यंत कमी करायचं होतं, पण डॉक्टरांनी सांगितलं की वजन हळूहळू कमी कर, नाहीतर गंभीर त्याचे परिणाम होऊ शकतात. मुख्य म्हणजे अवयव निकामी झाल्यास तुला वाचवणं कठीण होईल.” यानंतर विक्रमने डॉक्टरांचा सल्ला ऐकला आणि वजन त्याहून कमी केलं नाही.
विक्रमचा ‘थंगलान’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, ब्रिटिश काळात आदिवासी जमातींनी खाणकामामुळे भोगलेल्या संघर्षांची कथा यात दाखवण्यात आली आहे. विक्रमबरोबर या चित्रपटात मालविका मोहनन, पार्वती, पसुपती, आणि हॉलीवूड अभिनेता डॅनियल कॅल्टजेरोन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.