आरक्षण, डॉन, मर्डर-2, क्रिएचर , पेज 3, रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द इअर, 2 स्टेट्स, प्रेम रतन धन पायो आणि द गाजी अटॅक सारख्या डझनभर चित्रपटात काम करणारे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं करोनामुळे निधन झालं. अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा शोकाकुळ झालाय. सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी दिवंगत अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांना श्रद्धांजली वाहिलीय.

दिवंगत अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल हे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. ते भारतीय लष्करी सेवेत मेजर पदावरून निवृत्त झाले होते. 2002 मध्ये सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर 2003 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली.

(Photo Credit : Facebook)

एका इंटरव्ह्यूदरम्यान अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांनी सांगितलं होतं की, त्यांना पाकिस्तानमधल्या दोन सुप्रसिद्ध नेटवर्क कंपनीच्या जाहिरातीच्या ऑफर आल्या होत्या. या जाहिरातींचं चित्रीकरण बॅंकॉकमध्ये होणार होतं. पण त्यासाठी त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांना पाकिस्तानच्या नामांकित बिस्कीट कंपनीच्या जाहिरातीसाठी ऑफर आली होती, त्या जाहिरातींना देखील अभिनेते बिक्रमजीत यांनी नकार दिला होता.

(Photo Creadit: Facebook)

यापुढे संवाद साधताना अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल म्हणाले होते, नकार दिलेल्या दोन्ही जाहिरातीचे कॉर्डीनेटर त्यांच्या संपर्कात होते…त्यांनी नंतर पुन्हा एकदा जाहिरातीसाठी तगडी रक्कम ऑफर केली होती. पण तरीही त्यांनी त्यासाठी नकार दिला. या दोन ऑफर न स्विकारण्याचं कारण ही यावेळी अभिनेते विक्रमजीत यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात पाकिस्तानकडून आपल्या भारत देशावर वेगवेगळ्या कुरघोड्या सुरूच आहेत. सीमेवर पाकिस्तान ज्या पद्धतीने कट कारस्थान रचतोय, ते पाहून मला खूप दुःख वाटायचे, असे यावेळी कारण सांगताना अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल म्हणाले होते.