Malayalam Actor Vinayakan Divorce Story : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारा अभिनेता विनायकम याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल एक अत्यंत संवेदनशील खुलासा केला आहे. वयाच्या १९ व्या वर्षी महाराजा कॉलेजमध्ये सुरू झालेले प्रेम आणि तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ संसार मोडल्यानंतर विनायकम कमालीचा खचला आहे. ‘मनोरमा न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने पत्नी बबितापासून वेगळे होण्याचे संपूर्ण कारण स्पष्ट केले. विनायकमच्या मते, या घटस्फोटात पत्नीची कोणतीही चूक नसून फक्त आणि फक्त त्याचा स्वभाव कारणीभूत होता. तिच्या दूर जाण्यामुळे आयुष्यात मन मोकळे करण्यासाठी आता कोणीही उरले नसल्याचे सांगताना तो भावुक झाला.
कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र होतो – विनायकम
घटस्फोट होण्यामागे पत्नीची काहीही चूक नसून फक्त आणि फक्त स्वतःचा स्वभाव कारणीभूत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. तसेच त्यांच्यात कोणतेही वाद किंवा भांडणं झाली नाहीत, तर एकत्र संसार अशक्य झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतला, असंही त्याने नमूद केलं.
मन मोकळं करायला कोणीच उरलं नाही – विनायकम
“मला पत्नी होती आणि आता आम्ही वेगळे झालो आहोत. आमच्यात कोणतेही भांडण झाले नाही, फक्त आम्ही एकत्र राहू शकत नव्हतो म्हणून वेगळे झालो. सहसा आपण आपल्या मनातील गोष्टी किमान एका व्यक्तीजवळ तरी मोकळेपणाने बोलतो, हो ना? माझ्यासाठी ती माझी पत्नी होती. मी तिच्याशी सगळं शेअर करायचो. आता माझ्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती उरलेली नाही. इथूनच माझे आयुष्य खूप बदलले,” असे ‘मनोरमा न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत विनायकम म्हणाला.
पत्नी सोबत नसण्याचा आयुष्यावर काय परिणाम झाला? यावर तो भावुक होत म्हणाला, “मी १९ वर्षांचा असल्यापासून आम्ही दोघे एकत्र होतो. आमचा प्रेमविवाह होता. महाराजा कॉलेजमध्ये आमच्या नात्याला सुरुवात झाली होती. तब्बल ४० वर्षे एकत्र राहिल्यानंतर तिने अचानक साथ सोडल्याने माझ्यासाठी गोष्टी हाताळणं कठीण झालंय. खासकरून पैशांचे व्यवहार. माझ्याकडे आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाइन अॅपही नाही, तीच सर्व काही सांभाळायची.”
माझ्या स्वभावामुळे वेगळे झालो -विनायकम
घटस्फोटाला स्वतःला जबाबदार धरत विनायकम म्हणाला, “माझ्या स्वभावामुळे माझ्यासोबत राहणं तिच्यासाठी अवघड झालं. म्हणून आम्ही वेगळे झालो. यात तिची काहीही चूक नाही. मी तिला शांतता देऊ शकलो नाही. सततच्या कटकटी आणि भांडणांपेक्षा हे वेगळं होणंच आम्हा दोघांसाठी चांगलं होतं, असं मला वाटलं. आजही ती माझ्या अनेक गोष्टींची काळजी घेते. अगदी माझे यूट्यूब रिचार्ज करण्याचे कामही तीच करते.” विनायकमने मार्च २०२३ मध्ये सोशल मीडियावर आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती.
