तरुणाईच्या सर्वात लाडक्या सीटकॉमपैकी एक असणाऱ्या फ्रेण्ड्स या मालिकेमध्ये लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या कालाकाराचा मृत्यू झाला आहे. फ्रेण्ड्स मालिकेतील लोकप्रिय ठिकाण असणाऱ्या सेंट्रल कॅफेचा मॅनेजर म्हणजेच गंथर ही भूमिका साकारणाऱ्या जेम्स मायकल टेलरचं निधन झालं आहे. जेम्स हा ५९ वर्षांचा होता.

जून २०२१ मध्ये एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत मायकलने त्याला स्टेज फोरचा कॅन्सर असल्याचं जाहीर केलं होतं. २०१८ पासून तो कॅन्सरशी लढत होता. मात्र आज पहाटे त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या कुटुंबियांनी एक पत्रक जारी केलं आहे.

“जग त्याला गंथर नावाने ओळखायचे मात्र त्याच्या जवळचे त्याला एका अभिनेता, गीतकार, कॅन्सरबद्दल जागृती करणारा आणि प्रेम नवरा म्हणून ओळखत होते. मायकलला लाइव्ह म्युझिक फार आवडायचं. त्याला एकदा भेटलात तरी तुम्ही आयुष्यभर त्याचे मित्र होता, असा होता तो,” असं त्याच्या कुटुंबाने पत्रकात म्हटलं आहे.

मे महिन्यामध्ये ‘फ्रेण्ड्स : द रियुनियन’मध्ये तो सहभागी झाला होता. मात्र तो प्रकृतीच्या कारणामुळे प्रत्यक्षात कार्यक्रमाला उपस्थित राहिला नव्हता. तो झूमवरुन कार्यक्रमाला हजर होता. “ते माझ्या आयुष्यातील सर्वाधिक स्मरणार राहाणारे १० वर्षे होते. त्याहून अधिक चांगला अनुभव मला मिळाला नसता. त्या मालिकेतील सर्वचजण उत्तम होते आणि मजा करत काम करायचे. मला या मालिकेचा भाग असणं ही फार खास गोष्ट वाटते,” असं तो यावेळी म्हणालेला. मला आपल्या आजारपणाचा भांडवल करायचं नव्हतं म्हणून मी ‘फ्रेण्ड्स : द रियुनियन’दरम्यान माझ्या कॅन्सरसंदर्भात सांगितलं नव्हतं असंही मायकल म्हणाला होता.

फ्रेण्ड्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुनही त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय. तो आमच्या फ्रेण्ड्स कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावर मायकलच्या निधनाबद्दल चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली जातेय. तो कार्यक्रमामध्ये एवढ्यांदा दिसायचा की त्याचा उल्लेख ‘सेवंथ फ्रेण्ड’ म्हणून केला जायचा..