Yash Mother Pushpa On Allu Aravind Comment And Toxic Movie: ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाला मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसाद मिळतोय. याच पार्श्वभूमीवर, दाक्षिणात्य सुपरस्टार यशची आई पुष्पा अरुण कुमार यांनी निर्माते अल्लू अरविंद यांच्या जुन्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. अल्लू अरविंद यांनी ‘केजीएफ’ चित्रपटापूर्वी यशच्या स्टारडमवर शंका उपस्थित केली होती. सध्या पुष्पा अरुण कुमार यांच्या या वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
आपल्या मुलाच्या संघर्षाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “यश काही दहशतवादी नाही. ‘केजीएफ’पूर्वीच तो कर्नाटकात एक यशस्वी अभिनेता होता आणि त्याने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन स्वतःची लोकप्रियता सिद्ध केली होती.” लोक आजही ‘केजीएफ’आधी यश कोण होता, असा प्रश्न कसा काय विचारू शकतात? असा सवाल करत त्यांनी स्पष्ट केले की, २०१८ मध्ये ‘केजीएफ’ येण्यापूर्वीच ‘गुगली’, ‘ड्रामा’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’, ‘गजकेसरी’ आणि ‘संथू स्ट्रेट फॉरवर्ड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून यशने कन्नड सिनेसृष्टीत दशकभर राज्य केले होते.
यशने कोणत्याही गॉडफादरशिवाय करिअर केलं
यशच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, कोणताही गॉडफादर, आर्थिक पाठबळ किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना यशने या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्याचे वडील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात (KSRTC) बस चालक होते, तर आई गृहिणी होती. कुटुंबात कोणाचाही चित्रपटसृष्टीशी दुरान्वये संबंध नव्हता. टेलिव्हिजन मालिकांपासून सुरुवात करून कन्नड चित्रपटांमधून यशने शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे केले आणि त्यानंतर ‘केजीएफ’द्वारे तो पॅन-इंडिया स्टार बनला.
यशचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न- पुष्पा कुमार
“काही लोक जाणीवपूर्वक माझ्या मुलाचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ‘टॉक्सिक’ चित्रपटाबाबत चुकीचा प्रचार करत आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पण, जोपर्यंत प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा यशच्या पाठीशी आहे, तोपर्यंत त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले होते अल्लू अरविंद?
काही वर्षांपूर्वी एका इव्हेंटमध्ये अल्लू अरविंद यांच्या ‘गीता आर्ट्स’ या प्रोडक्शन हाऊसने मोठ्या बजेटच्या चित्रपटांऐवजी लहान बजेटच्या प्रोजेक्ट्सकडे मोर्चा का वळवला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी निर्मितीचा वाढता खर्च हे कारण सांगितले होते.
चित्रपटांचे बजेट अभिनेत्यांच्या मानधनामुळे वाढते का, यावर बोलताना त्यांचा मुलगा अल्लू अर्जुन याचं उदाहरण दिलं होतं. तेव्हा अरविंद यांनी नकार देत यशचं नाव घेतलं होतं. “‘केजीएफ’पूर्वी यश नक्की कोण होता?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ‘केजीएफ’चे यश हे यशच्या स्टारडममुळे नसून चित्रपटाचा भव्य मेकिंग, स्केल आणि व्हिज्युअल इफेक्ट्समुळे मिळाले होते, असा दावा त्यांनी केला होता. थोडक्यात, त्या भव्यतेमध्ये कोणत्याही अभिनेत्याला घेतले असते तरी चित्रपट तितकाच यशस्वी ठरला असता, असं त्यांचं म्हणणं होतं.
