Aishwarya Lekshmi casteism experience during shoot : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेला अस्वस्थ करणारा अनुभव शेअर केला आहे. ईरोडमधील एका गावात शूटिंग करत असताना तिथल्या लोकांनी तिला थेट तिचं गोत्र आणि जात विचारली. तो अनुभव खूप अस्वस्थ करणारा होता, असं ऐश्वर्याने म्हटलंय.

रजनी हरिदासशी बोलताना ऐश्वर्या ईरोडमधील दिवसांची आठवण सांगत म्हणाली, “ते एक खूपच वेगळं आयुष्य होतं. आम्ही १९९६ च्या काळातील एका प्रसंगाचं शूटिंग करत होतो. मी दिग्दर्शकाला सतत विचारायचे की, ‘लोक याला खरंच जुना काळ समजतील का?’ कारण ती जागाच खूप वेगळी, जुन्या विचारांची होती. तिथली संस्कृतीही पूर्णपणे वेगळी होती.”

मला माझं गोत्र माहीतच नाही – ऐश्वर्या

Aishwarya Lekshmi casteism experience
अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीने सांगितला शूटिंगचा अनुभव (फोटो- इन्स्टाग्राम)

दैनंदिन आयुष्यात तिथे जातीची जाणीव कशी करून दिली जायची, याबाबत ऐश्वर्याने सांगितलं. “तिथल्या लोकांनी मला माझं गोत्र विचारलं. त्या क्षणी मला मल्याळी लोकांचा मनापासून अभिमान वाटला, कारण माझ्या आयुष्यात मला आजवर कोणीही असा प्रश्न विचारला नव्हता. मला तर माझे गोत्र काय आहे हेही माहीत नाही,” असं ऐश्वर्याने सांगितलं.

Aishwarya Lekshmi casteism experience
अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी (फोटो- इन्स्टाग्राम)

जातीबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांवर ऐश्वर्याला संताप व आश्चर्य वाटायचे. “माझ्या जातीने किंवा गोत्राने तुम्हाला काय फरक पडतो? हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं,” असं ऐश्वर्या म्हणाली. पण या अनुभवानंतरही सगळे लोक सारखेच नव्हते, असं तिने स्पष्ट केलं. “मी असं अजिबात म्हणत नाहीये की तिथले सगळेच लोक तसे आहेत, पण मला हा अनुभव आला,” असं ऐश्वर्या म्हणाली.

Aishwarya Lekshmi casteism experience
अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी (फोटो- इन्स्टाग्राम)

डॉक्टर ऐश्वर्या लक्ष्मी झाली अभिनेत्री

दरम्यान, ऐश्वर्या लक्ष्मी तिरुवनंतपुरम येथे डॉक्टर होती. तिने २०१७ मध्ये ‘नजांडुकलुडे नाट्टिल ओरिडवेला’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. त्याच वर्षीच्या ‘मायानदी’ चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. मग तिने मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ती ‘वरथन’, ‘काणेक्काणे’, ‘अम्मु’, ‘कुमारी’, ‘पोन्नियिन सेल्वन: १ व २’, ‘गट्टा कुस्ती’, ‘मामन’, ‘हेलो मम्मी’ आणि ‘गट्टा कुस्ती २’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.