Actress Aishwarya Rajesh Bad Experience : मनोरंजनसृष्टीत काम करताना कलाकारांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यात अभिनेत्रींना तर अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागतो. अशातच एका अभिनेत्रीनं तिच्याबरोबरचा वाईट प्रसंग सांगितला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे फोटोग्राफरनं अश्लील मागणी केली होती. त्याबद्दल तिनं नुकताच खुलासा केला आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राजेश.

तमीळ, तेलुगू, मल्याळम व हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राजेश हिने अलीकडेच आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक अस्वस्थ करणारा अनुभव आल्याचं सांगितलं. एका मुलाखतीत तिनं एका फोटोग्राफरनं तिच्याकडे “तुझं शरीर पाहायचं आहे”, अशी विचित्र मागणी केली असल्याचं सांगितलं.

निखिल विजयेंद्र सिम्हा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ऐश्वर्यानं तिच्याबरोबरचा हा प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की, हा अनुभव तिच्यासाठी खूप धक्कादायक होता. ती म्हणाली, “मी तेव्हा खूप लहान होते आणि माझ्या भावाबरोबर शूटिंगच्या ठिकाणी गेले होते. फोटोग्राफरनं भावाला बाहेर बसायला सांगितलं, मला आत नेलं, हातात अंतर्वस्त्र दिलं आणि म्हणाला ‘मला तुझं शरीर पाहायचं आहे’.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “त्या वयात मला या इंडस्ट्रीबद्दल काहीच माहीत नव्हतं. कदाचित इथे हे असंच असतं, असं वाटून मी जवळपास तयारही झाले होते; पण मनात काहीतरी चुकीचं घडत असल्यासारखं वाटत होतं”.

त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिन फोटोग्राफरला सांगितलं की, तिला आधी भावाची परवानगी घ्यावी लागेल आणि ती तिथून निघून गेली. ती म्हणाली, “मला आजही वाटतं, त्यानं अशा कितीतरी मुलींना हे करायला भाग पाडलं असेल. मी हा प्रकार माझ्या भावालाही कधी सांगितला नाही.”

याच संवादात ऐश्वर्यानं आणखी एक प्रसंग सांगितला. “एकदा मी शूटिंगला उशिरा पोहोचले होते. तेव्हा दिग्दर्शक सगळ्यांसमोर माझ्यावर ओरडले. तो माझ्यावर रागावलेला नव्हता; पण तो नेहमी माझी तुलना इतर अभिनेत्रींशी करायचा. माझी चूक असू शकते; पण सगळ्यांसमोर अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये,” असे तिने स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ऐश्वर्या राजेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘अथाकथी’, ‘अवर्गलम इवर्गलम’, ‘काका मुत्ताई’, ‘वडा चेन्नई’ आणि ‘काना’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘वर्ल्ड फेमस लव्हर’, ‘का पे रणसिंगम’, ‘रिपब्लिक’ आणि ‘थिट्टम इरांडू’ सारख्या चित्रपटांसाठी तिचं खूप कौतुक करण्यात आलं.

ऐश्वर्या राजेश नुकतीच अर्जुनबरोबरच्या तमीळ चित्रपट ‘थीयावर कुलैगल नडुंगा’मध्ये दिसली होती. तसेच ती २०२५ मधील हिट चित्रपट ‘संक्रांतीकी वस्तुनाम’ मध्येही झळकली आहे. सध्या ती भरत दर्शन दिग्दर्शित ‘ओह..! सुकुमारी’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. या चित्रपटात अभिनेता थिरुवीर मुख्य भूमिकेत आहे.