स.प. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात होते त्यावेळी मी. सत्यदेव दुबेजी, माझे अभिनयातले गुरू, दहावीनंतरच माझ्या आयुष्यात आले होते. त्यामुळे दहावीच्या आधी गाण्यात आणि नृत्यात भाग घेणारी मी दहावीनंतर नाटकाच्या वाटेवर आधी अडखळत आणि मग मजेत, आनंदात कधी चालायला लागले माझं मलाच कळलं नाही! त्यातही आईला रंगमंचावर अभिनय करतानाच पाहिलेलं असल्याने आपणही तिच्याच वाटेने जायचं हे नकळत ठरत चाललं होतं. नेमकं याच वेळी स. प. महाविद्यालयात माझा मित्र सुवर्ण कुलकर्णीच्या आग्रहाने ‘प्रसंग नाट्यदर्शन’ स्पर्धा केली आणि अभिनय चांगलाच आवडतो असं जाणवलं.
त्यानंतरच्या वर्षी पुरुषोत्तम करंडक आयुष्यात आला. पहिल्या वर्षी माझा मित्र शैलेश देशमुखनं दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम केलं खरं, पण मी दुसऱ्या वर्षात येईपर्यंत शैलेश तिसरं वर्ष संपवून कॉलेजबाहेर पडलेला होता, त्यामुळे आता ‘पुरुषोत्तम’ला नाटक बसवणार कोण असा प्रश्न माझ्यासमोर होता. तोच दुबेजींच्या दुसऱ्या नाट्य शिबिरात माझा मित्र झालेला संदेश कुलकर्णी भेटला. मी त्याच्यासमोर ‘आता नाटक कोण बसवणार?’ हे रडगाणं गात असताना तो सहज म्हणून गेला, ‘तू बसव ना मग.’ एकदम थबकायलाच झालं! हा पर्याय आलाच नव्हता मनात माझ्या. पण संदेशचा माझ्यावरचा अदम्य विश्वास पाहून म्हटलं, ‘‘बघूया करून’’.
हेही वाचा >>>प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत
त्याला म्हटलं, ‘ठीक आहे मी बसवते’. उत्साहात हो म्हटलं पण नंतर लक्षात आलं की एकांकिकाच नाहीये बसवायला. मग संदेशलाच म्हटलं ‘मी बसवते पण तू लिहून दे’. त्यानेही उत्साहात (कदाचित मला इम्प्रेस करण्यासाठी) लगेच लिहून काढली एकांकिका, ‘पार्टनर्स’ नावाची. हे माझं पहिलं दिग्दर्शन. त्या एकांकिकेत तीन स्त्री पात्रं होती जी माझ्याच वयाची. एकांकिका एका हॉस्टेलच्या रूममध्ये घडायची. मला आठवतं सेटवर तीन पलंग दाखवायचे होते तर महाविद्यालयाच्या माझ्या त्या वेळच्या होस्टेलमधल्या मैत्रिणींनी, तालमी चालू असेपर्यंत स्वत: जमिनीवर झोपून, त्यांचे पलंग आम्हाला वापरायला दिले होते. त्यावेळी आमच्या गौरी भागवत मॅडमपासून ते मानसी, मना या माझ्या सहकलाकारांपर्यंत संपूर्ण महाविद्यालय माझ्या पाठीशी उभं असलेलं आठवतं. त्यानंतर संदेश माझ्या मित्रापासून माझा कायमचा साथीदार झाला तेव्हाही आमच्यात ‘त्यानं नाटक लिहावं आणि मी ते बसवावं’ असा अलिखित करार झाला होता. त्याविषयी आम्ही स्पष्ट बोललो नसलो तरी संदेशच्या बाजूने तर ते अध्याहृतच होतं. आमचं लग्न झाल्यावर मी ‘आजी’ नावाची शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली तेव्हा त्यानं त्याच आनंदात माझा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘पार्टनर्स’ आणि ‘आजी’ या दोन्ही अनुभवात तो सावलीसारखा बरोबर होता. नंतर माझी अभिनयाची कारकीर्द सुरू झाली आणि दिग्दर्शन मागेच पडत गेलं.
संदेश वेळोवेळी मला ‘तू दिग्दर्शन करायला हवंस’ असं म्हणत राहिला. वेळोवेळी देशोदेशीच्या स्त्री दिग्दर्शकांच्या कलाकृती मला दाखवायला आवर्जून नेत राहिला. ‘तू या वाटेवर जायला हवंस’ असं सुचवत राहिला. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते हेच खरं. संदेश आणि मी ‘पुनश्च हनिमून’ची निर्मिती केली आणि आम्हाला आतून मनापासून जे करायचं आहे तिथे आम्ही पोहोचलो आहोत असं वाटलं. ‘स्क्रिप्टीज् क्रिएशन्स’ या कंपनीत आम्ही दोघे एकमेकांचे भागीदार झालो आणि अजून एक अलिखित करार झाला आमच्यात, आपल्या मनाला खोलवर भिडतील अशी नाटकं करत राहण्याचा! ‘पुनश्च हनिमून’ या पहिल्या निर्मितीने आमच्या मित्रमंडळींच्या शुभेच्छांनी आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याने पंचाहत्तरी गाठली तेव्हा हुरूप वाढला. संदेशनं पुढचं नाटक लिहिलं आणि तोच म्हणायला लागला ‘पुनश्च मी दिग्दर्शित केलं, पण हे नाटक तू करायला हवंस’. ‘असेन मी… नसेन मी…’ हे नाव आणि आज जवळपास प्रत्येक घराला आपला वाटेल असा विषय. वाटलं, ‘हो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण! करूयात या नाटकाचं दिग्दर्शन’. यातली एक भूमिका मी करणार होते इतर दोन भूमिकांसाठी नीनाताई कुळकर्णी आणि शुभांगीताई गोखले यांसारख्या दोन ताकदवान आणि अनुभवी कलाकार मला मिळाल्या तेव्हा एक गंमतशीर योगायोग माझ्या लक्षात आला. मी पहिल्यांदा दिग्दर्शन केलेल्या ‘पार्टनर्स’ एकांकिकेत मी धरून तीन स्त्री पात्रं होती आणि या नाटकातही तसंच आहे – मी धरून तीन स्त्री पात्रं!
मी यात अभिनयही करते आहे हे समजल्यावर माझ्या कित्येक कलाकार मैत्रिणी मला म्हणाल्या, ‘अभिनय आणि दिग्दर्शन एकत्र? भीती नाही का वाटत?’ खरं सांगायचं तर वाटते आहेही आणि नाहीही! तालमी सुरू झाल्यावर या दिग्दर्शकीय प्रवासातले अनेक चढउतार मी अनुभवले, त्यातल्या प्रत्येक अवघड वळणावर माझ्या आयुष्यातल्या इतर उत्तम दिग्दर्शकांची मनापासून आठवण आली. ते या अवघड वळणावर काय निर्णय घेतील, अशी कल्पना करत निर्णय घेत गेले. काही बरोबर असतील, काही नसतीलही, पण एक मात्र नक्की, प्रत्येक दिवशी खूप काही नवं शिकत गेले. माझे गुरू दुबेजी म्हणाले होते मला, ‘कायम विद्यार्थिनी राहा.’ ‘दिग्दर्शन’ हा त्या शिकण्याच्या प्रवासातला मोलाचा टप्पा ठरला आहे.
आता नाटक चार दिवसांवर येऊन ठेपलंय. तालमीच्या हॉलमधून रंगीत तालमीच्या थिएटरकडे निघालो आहोत आम्ही. या टप्प्यावर मागे वळून पाहताना कृतज्ञ वाटत आहे. माझ्या सहकलाकारांकडून, त्यांच्या अनुभवातून मी अनेक गोष्टी शिकत आहे. प्रदीप मुळ्ये यांच्यासारख्या मातब्बर नेपथ्यकाराबरोबर गप्पा मारताना रंगमंचीय अवकाशाचे कितीतरी कंगोरे माझ्यासमोर उलगडत आहेत. पडदा उघडण्याची वेळ जवळ आली आहे. संदेशने लिहिलेली ही हृदयस्पर्शी गोष्ट, उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साह्याने आम्ही रंगमंचावर सांगणार आहोत…. ही गोष्ट जशी आमची झाली, तशी ती तुम्हा सर्वांची होऊन जावो हीच प्रार्थना!