Anna Jaisinghani Premanand Maharaj: मनोरंजन विश्वातील ग्लॅमर आणि झगमगाटाची ओढ अनेकांना असते, पण अभिनेत्री अॅना जयसिंघानी हिने या सर्वाचा त्याग करून भक्तीचा मार्ग निवडला आहे. २०११ मध्ये सलमान खानसोबत फ्रीलान्स कोरिओग्राफर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अॅनाने अल्पावधीतच ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ आणि ‘फिअर फाइल्स’ सारख्या मालिकांतून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाली. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अॅनाने ती वृंदावनला का स्थायिक झाली आणि जानेवारी २०२६ मध्ये प्रेमानंद महाराजांची शिष्या कशी बनली, याबद्दलचा आपला भावूक प्रवास उलगडला आहे.
आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल बोलताना अॅना जयसिंघानीने सांगितलं की, ती मूळची ग्वाल्हेरची आहे. “माझं शिक्षण ‘बीए इंग्लिश ऑनर्स’मध्ये झालंय. मला डान्स आणि अभिनयाची खूप आवड होती. मला नेहमीच लोकप्रिय व्हायचं होतं आणि या सगळ्याची सुरुवात डान्सपासून झाली. कॉलेजमध्ये असताना मी मुलांना डान्स शिकवायचे. त्यानंतर मी मुंबईत आले आणि बालाजी टेलिफिल्म्समधून अभिनयाचा कोर्स केला. त्यानंतर मला ‘सावधान इंडिया’, ‘फिअर फाइल्स’ यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. पण सोनी टीव्हीवरील ‘देखा एक ख्वाब’ या मालिकेतून मला मोठी संधी मिळाली. या मालिकेत अरुणा इराणीदेखील होत्या,” असं अॅना जयसिंघानी म्हणाली.
इस्कॉन मंदिरातून सुरू झाला प्रवास
अॅना जयसिंघानी म्हणाली, “मी मुंबईत ऑडिशन्स देत होते. त्याच काळात माझी ‘इस्कॉन’ मंदिरात काही लोकांशी मैत्री झाली. तिथूनच मी अध्यात्माकडे वळले आणि माझ्या माझ्या मनात त्याविषयी ओढ वाढली. लवकरच मला जाणवलं की हे भौतिक जग म्हणजे फक्त एक आभास आहे. मी काही काळ पुण्यातही राहिले, तिथे मी इस्कॉन मंदिरात सेवा केली.”
प्रेमानंद महाराजांची शिष्या झाली अॅना
अॅनाचं अभिनय करिअर फार लहान राहिलं, कारण तिला वृंदावनला जायचं होतं. “मी जेव्हा इस्कॉनमध्ये होते, तेव्हा मला गुरुंच्या मार्गदर्शनाची ओढ लागली होती. योग्य गुरू मिळावेत म्हणून मी खूप प्रार्थना केली. त्यानंतर मी वृंदावनला आले आणि त्या रात्री प्रेमानंद महाराज माझ्या स्वप्नात आले. जानेवारी २०२६ मध्ये मी त्यांची शिष्या झाले.”
आपल्या जुन्या आणि नव्या आयुष्याची तुलना करत अॅना म्हणाली, “दोन्ही आयुष्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माझ्या जुन्या आयुष्यात सगळा झगमगाट होता, तिथे दिखावा होता. तुम्ही पैसे खर्च करता, शॉपिंग करता आणि मोठ्या फ्लॅट्समध्ये राहता; पण इथे फक्त भक्ती आहे. कधीकधी मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण येते आणि हसायला येते.”
