Actress Charmila Personal Life : ९० च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री चार्मिला हिने आपल्या लव्ह लाईफबद्दल अत्यंत वेदनादायी आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. “प्रेमाने माझे आयुष्य पूर्णपणे बरबाद केले,” अशी उद्विग्न खंत तिने व्यक्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेते बाबू अँटनी यांच्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न करण्यापासून ते अभिनेता किशोर सत्याच्या सांगण्यावरून विक्रमच्या ‘सेतू’ या ब्लॉकबस्टर सिनेमाची ऑफर नाकारण्यापर्यंत अनेक धक्के तिने सहन केले. दोन घटस्फोट आणि अयशस्वी नात्यांनंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यासह करिअरलाही मोठी उतरती कळा लागली.

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर, १९९१ मध्ये चार्मिलाने ‘ओयिलाट्टम’ चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर मोहनलाल यांच्याबरोबर ‘धनम’ आणि ‘अंकल बन’ या सलग चित्रपटांत काम करून तिला लोकप्रियता मिळाली. ९० च्या दशकात तिने तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. ‘कडल’ (१९९४) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चार्मिला आणि ॲक्शन स्टार बाबू अँटनी यांची पहिली भेट झाली. त्यानंतर ‘राजधानी’ आणि ‘कंबोलम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी एकत्र एकूण ६ चित्रपट केले. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले. चार्मिलाने ‘जेबी जंक्शन’ कार्यक्रमात सांगितलं की, तिच्या वडिलांना बाबू अजिबात आवडायचे नाही. बाबू वयाने तिच्यापेक्षा खूप मोठे होते आणि तिच्या वडिलांनी त्यांच्याबद्दल काही वाईट गोष्टी ऐकल्या होत्या.

ब्रेकअपनंतर केलेला आत्महत्येचा प्रयत्न

ती पुढे म्हणाली, “बाबू एकदा अमेरिकेला गेले ते परत आलेच नाहीत. मला वाटतं की त्यांच्या भावामुळे हे घडलं. पण बाबू वाईट माणूस आहेत असं मला अजूनही वाटत नाही. ते माझे पहिले प्रेम होते, तेव्हा मी १९ वर्षांची होते. आमचं नातं तुटल्यावर मी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण माझ्या आईने मला वाचवलं.”

वडिलांचा विरोध अन् बाबू अँटनीशी जवळीक

‘ऑनमनोरमा’शी बोलताना तिने सांगितलं की, बाबू तिची खूप काळजी घ्यायचे. एकदा शूटिंग दरम्यान तिच्या खोलीतील गीझर बंद पडल्यावर बाबू स्वतःच्या खोलीतून गरम पाण्याची बादली घेऊन आले होते, पण तिच्या वडिलांनी रागाने ती बादली हिसकावली होती. एका दुर्गम ठिकाणी शूटिंगदरम्यान गाडी उशिरा आल्यावर बाबूंनी स्वतःची गाडी त्यांना दिली होती.

actress-charmila-relationship-story-babu-antony-kishor-satya
अभिनेत्री चार्मिला (फोटो- इंडियन एक्सप्रेस आर्काइव्ह)

चार्मिलाच्या मते, तिच्या वडिलांच्या कडक स्वभावामुळेच ती बाबूच्या अधिक जवळ गेली. “माझ्या वडिलांनी जर मला प्रेमाने समजावलं असतं, तर मी त्या नात्यात गेले नसते. एक मुलगी म्हणून मी पूर्णपणे अपयशी ठरले. वडिलांनी आणलेल्या लग्नाच्या स्थळाला मी होकार दिला असता, तर आज माझी ही अवस्था झाली नसती,” अशी खंत तिने व्यक्त केली.

अभिनेते बाबू अँटनी यांनी अभिनेत्रीबरोबरच्या अफेअरचे सर्व दावे फेटाळून लावले. ते म्हणाले, “मला आयुष्यभर अविवाहित राहायचं होतं, पण मी एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो, कोणत्याही अभिनेत्रीच्या नाही. अनेक महिलांनी मी त्यांच्या प्रेमात असल्याचा दावा केला होता. पण कुठल्या अभिनेत्रीने माझ्याबरोबरच्या नात्याबाबत काय आरोप केलेत, याची मला कल्पना नाही.” पण या दोघांच्या अफेअरबद्दल ज्येष्ठ पटकथा लेखक कलूर डेनिस यांनी लिहिलं होतं.

किशोर सत्याशी लग्न आणि करिअरला फटका

बाबू अँटनीशी ब्रेकअप झाल्यानंतर चार्मिलाची अभिनेता किशोर सत्याबरोबर जवळीक वाढली. त्यावेळी तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. पुढे त्यांनी लग्न केलं, पण हे नातं टिकलं नाही आणि चार्मिलाच्या करिअरला उतरती कळा लागली. चार्मिला म्हणाली, “मी नैराश्यातून जात असताना किशोर माझ्याशी प्रेमाने बोलायचा. लवकरच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. मला चित्रपटांच्या अनेक ऑफर येत होत्या, तेव्हाच आम्ही लग् नकेलं. लग्नानंतर किशोरने मला चित्रपटांमध्ये काम करणं थांबवायला सांगितलं आणि तो शारजाहला निघून गेला. किशोरला आवडणार नाही म्हणून मी विक्रमसोबतच्या ‘सेतू’ (१९९९) चित्रपटाची ऑफर नाकारली. चार वर्षे तो तिथे आणि मी इथे राहिलो. नंतर एका शोसाठी मी दुबईला गेले असता माझी त्याची भेट झाली. तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की त्याला आता हे नातं संपवायचंय.”

चार्मिला व किशोर यांनी दोघांच्या कुटुंबातील ४ सदस्यांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. नंतरही किशोरने हे लग्न गुपित ठेवायला सांगितलं होतं. किशोरने फक्त प्रसिद्धीसाठी लग्न केलं आणि नंतर आम्ही परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला, असं चार्मिलाने सांगितलं.

चार्मिलाचं दुसरं लग्नही मोडलं

चार्मिलाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राजेशशी दुसरं लग्न केलं. तो तिच्या बहिणीचा मित्र होता आणि तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान होता. “मी ख्रिश्चन आहे, आणि राजेशची इच्छा होती की मी आमच्या मुलासाठी हिंदू धर्म स्वीकारावा. पण मला त्याला ख्रिश्चन धर्माचे संस्कार द्यायचे होते. कायदेशीररित्या आमचा आता घटस्फोट झाला आहे, पण आम्ही अजूनही संपर्कात आहोत. न्यायालयीन कामकाजादरम्यान माझ्या मुलाने माझ्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली. राजेश बरेचदा मुलाला भेटायला येतो,” असं चार्मिला म्हणाली.

“आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझे प्रेमसंबंध राहिले, पण मी माझ्या अनुभवांतून धडा शिकू शकले नाही,” अशी खंत चार्मिलाने व्यक्त केली.