सध्या राज्यासह देशभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरु आहे. भाजपा खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. यावरुनही आता मनसेवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. याआधीही सय्यद यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेनंतर ट्विट करत टीका केली होती. आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेवरुन भाष्य केले आहे. दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

“सभा करायच्याच असतील तर अयोध्या मध्ये करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून,” असा टोला दीपाली सय्यद यांनी मनसेला लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या दर्शनाला जाणार आहे. त्यांच्यासोबत राज्यातील विविध भागातील मनसैनिक जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजपासून अयोध्येत जाण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास ८ ते १० हजार नागरिकांची नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे, मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.

“आज आणि उद्या राज ठाकरे पुणे दौर्‍यावर आहेत. त्या दरम्यान शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. तर औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी सांगितल्यानुसार राज्यातील अनेक भागात येणार्‍या काळात सभा घेतल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही २१ ते २७ मे दरम्यान पुण्यात सभेच नियोजन केले आहे. त्या दृष्टीने शहरातील २० ठिकाणे पोलिसांना सांगितली आहेत. पुण्यात सभा केव्हा घेतली जाईल,याबाबत उद्या राज ठाकरेच जाहीर करतील,” असेही वागसकर यांनी सांगितले.