‘पुष्पा २’ या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप होत असल्याचं वक्तव्य एका लोकप्रिय अभिनेत्रीने केलं आहे. चित्रपटासाठी २० दिवस शूटिंग केलं होतं, पण प्रत्यक्षात थिएटरमध्ये सिनेमा पाहिल्यावर धक्का बसल्याचं या अभिनेत्रीने म्हटलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे दिवी वडथ्या. ती काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.
‘बिग बॉस तेलुगू ४’ मुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीवी वडथ्या हिने सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘व्हिज्युअल टॉक्स पॉडकास्ट’मध्ये बोलताना दीवीने सांगितलं की तिला या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप होत आहे. कारण तिला सुरुवातीला जी भूमिका सांगण्यात आली होती, ती प्रत्यक्षात खूप वेगळी आणि छोटी दाखवण्यात आली.
भूमिकेकडून खूप अपेक्षा होत्या, पण…
‘पुष्पा २’ मधील तुझ्या भूमिकेबद्दल तू आनंदी आहेस का? असं विचारल्यावर दीवी म्हणाली, “अजिबात नाही. जेव्हा मला या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा ती एक मोठी भूमिका असेल असं सांगितलं होतं. कारण ‘पुष्पा कुठे आहे?’ या टीझरची सुरुवातच माझ्यापासून झाली होती. त्यामुळे मलाही या चित्रपटातील माझ्या भूमिकेकडून खूप अपेक्षा होत्या. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रत्यक्षात तसं काहीच नसल्याचं माझ्या लक्षात आलं.”
पुष्पा २ मध्ये काम केल्याचा पश्चात्ताप – दिवी
या चित्रपटात काम केल्याचा पश्चात्ताप वाटतो का? असा प्रश्न विचारल्यावर दिवीने होकार दिला. “हो, मला खूप वाईट वाटलं. पण माझ्या दुःखाची पर्वा कोणाला का असेल? आपल्याला स्वतःलाच सांभाळत पुढे जावं लागतं. चित्रपट पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. माझी भूमिका खूप चांगली असेल हा विचार करून मी माझ्या १० मित्रांना सोबत घेऊन चित्रपट पाहायला गेले होते. कारण मी या चित्रपटासाठी १० दिवस डबिंग केले होते आणि २० दिवस शूटिंग केले होते. मी खूप चांगला अभिनयही केला होता, पण चित्रपट पाहिल्यावर मला मोठा धक्का बसला,” असं दिवी वडथ्या म्हणाली.
दिवी वडथ्याने कोणती भूमिका केली साकारली होती?
२०२४ मध्ये आलेल्या ‘पुष्पा २’ या चित्रपटात दीवीने ‘मिन्नू उमा देवी’ नावाच्या टीव्ही रिपोर्टरची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिचे पात्र सत्य शोधण्यासाठी अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा राजचा पाठलाग करताना दिसते. ‘पुष्पा कुठे आहे?’ या प्रमोशनल व्हिडीओमध्येही ती होती. रोजंदारीवर काम करणारा हा मजूर आता स्मगलर बनून कायद्यापासून कुठे लपून बसलाय, असा प्रश्न विचारताना दिसली होती.
