Actress HS Keerthana left acting Became IAS Officer : आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण ते पूर्ण करण्यात फार कमी लोकांना यश येतं. काही जण बरीच वर्षे मेहनत करून यश मिळवतात, तर काहींच्या पदरी अपयश येतं. काही असेही अधिकारी आहेत, जे आधी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते, पण नंतर अभ्यास करून, कठोर परिश्रम करून यश मिळवून प्रशासकीय सेवेत रुजू झाले. आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी फिल्म इंडस्ट्रीतील आपले ग्लॅमरस करिअर सोडून सरकारी अधिकारी झाली. तिने लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिला खूप लोकप्रियता मिळाली, पण या अभिनेत्रीने आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं.
या अभिनेत्रीचं नाव एच.एस. कीर्तना. कीर्तनाचे बालपण कॅमेरे आणि चित्रपटांच्या सेट्सवर गेले. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बाल कलाकार म्हणून एक खास ओळख निर्माण केली. कीर्तनाने चौथ्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. बाल कलाकार म्हणून तिने ‘कर्पुरदा गोम्बे,’ ‘गंगा-यमुना,’ ‘उपेंद्र,’ ‘हब्बा,’ आणि ‘लेडी कमिशनर’ यासारख्या अनेक लोकप्रिय कन्नड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. कीर्तना अभिनयामुळे कर्नाटकात घराघरात लोकप्रिय झाली. पण नंतर तिची आवड बदलली आणि कीर्तनाने आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोडला अभिनय
एच एस कीर्तनाचा जन्म कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यातील होस्केरे गावात झाला, नंतर ती बंगळुरूला आली आणि शिक्षण पूर्ण करतानाच अभिनय करू लागली. तिने इंजिनिअरींगची डिग्री घेतली. कीर्तनाचे वडील श्रीनिवास एचटी यांची इच्छा होती की लेकीने सरकारी अधिकारी व्हावं आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने अभिनयाला अलविदा केलं.
२०११ मध्ये मिळवली पहिली सरकारी नोकरी
कीर्तनाने अभ्यास सुरू केला. कठोर परिश्रम करत तिने २०११ मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा (केएएस) परीक्षा उत्तीर्ण केली आणि दोन वर्षे अधिकारी म्हणून काम केलं. पण कीर्तना या नोकरीत स्थिरावली नाही. तिने यूपीएससीची परीक्षा द्यायचं ठरवलं. कीर्तनाने २०१३ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पाच प्रयत्नांमध्ये तिला अपयश आलं. या काळात ती नोकरी व घरातील जबाबदाऱ्या सांभाळत राहिली. पण तिने हार मानली नाही आणि २०२० मध्ये सहाव्या प्रयत्नात, तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिने यूपीएससी परीक्षेत १६७ वा क्रमांक मिळवला. तिची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.
आयएएस अधिकारी झाल्यानंतर, कीर्तनाची मांड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. इथे कीर्तनाने प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य बजावले. सध्या, कीर्तना चिक्कमंगळुरू येथील जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात सेवा बजावत आहेत.
