राजकारण आणि सत्ताकारणाविषयी सातत्याने बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ या आगामी हिंदी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठे कुतूहल आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर चित्रपट करण्याचा आणि त्यातही स्वत: मुख्य भूमिका साकारण्याची मनीषा कंगनामध्ये कुठून जागली? या प्रश्नाचं उत्तर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने दिलं आहे.
आणीबाणीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेण्याच्या इच्छेपोटी इंदिरा गांधी यांचं चरित्र वाचनात आलं. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमधून खूप काही शिकण्यासारखं आहे, असं सांगतानाच त्यांच्या जीवनप्रवासातूनच चित्रपटाची प्रेरणा मिळाली, असं कंगनाने स्पष्ट केलं.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना राणावत अभिनीत आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटात तिच्याबरोबर अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतीश कौशिक अशा अनेक नामांकित कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या आठवणी जागवताना कंगनाने दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांना मिनिटभर शांत राहून श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही चित्रपटाचं प्रदर्शन अडथळ्यांविना होत नसतं, तिच्यासाठीही ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास खचितच सोपा नव्हता, मात्र चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांनी तिच्याबरोबर खंबीरपणे उभं राहात चित्रपट पूर्ण करण्यास सर्वतोपरी साहाय्य केलं, असं सांगत तिने आपल्या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे आभार मानले.
हेही वाचा >>> राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची कथाकल्पना सुचण्यामागे आणीबाणीविषयीची उत्सुकता कारणीभूत ठरली, असंही तिने सांगितलं. ‘आणीबाणीच्या वेळी असं घडलं होतं, तसं घडलं होतं अशा कैक गोष्टी मी लहानपणापासून वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या होत्या.
ऐंशीच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या पिढीने सत्तरच्या दशकातील या खूप महत्त्वाच्या गोष्टी अनुभवलेल्या नाहीत. त्यामुळे या विषयावरची जिज्ञासा म्हणून मी त्याविषयीचे लेख, पुस्तकं वाचायला सुरुवात केली’, असं कंगनाने सांगितलं.
या सगळ्या साहित्यामध्ये पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या ‘इंदिरा गांधी : अ बायोग्राफी’ या पुस्तकामुळे खूप प्रभावित झाल्याचं तिने सांगितलं. ‘या पुस्तकात इंदिरा गांधी यांचा त्यांचे गुरू जे. कृष्णमूर्ती यांच्याबरोबर एक संवाद आहे. ‘इंदिरा ही आणीबाणी योग्य नाही, तू हे थांबवलं पाहिजेस’, असं त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं. त्या वेळी त्याचं उत्तर देताना ‘मी एका भयंकर अशा सैतानावर स्वार आहे, सुरुवातीला मला त्याचा आनंद वाटत होता पण आता जर मी त्यातून बाहेर पडले तर हा सैतान मला खाऊन टाकेल’, असं सांगत एक प्रकारे आपणच घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांपासून आपण आता वाचू शकणार नाही याची जाणीवच त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू एक कलाकार म्हणून मला शेक्सपिअरच्या शैलीतील शोकांतिकेशी साधर्म्य असलेली वाटली आणि मला त्यात चित्रपटाची कथा दिसली’, असं कंगनाने सांगितलं.
अनेकदा मोठ्या व्यक्ती आपल्या अहंकारामुळे किंवा आपलं म्हणणं खरं करण्याच्या नादात निर्णय घेतात वा एखाद्या गोष्टीत खोलवर घुसतात, मात्र त्या नादात घडून गेलेल्या चुकीची किंमत मोजल्याशिवाय त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. आपल्या थोरामोठ्यांनी, पूर्वजांनी, पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनी घेतलेले निर्णय आणि त्याचे परिणाम यातून आपण काही ना काही बोध घेतला पाहिजे. अशा निर्णयाचे परिणाम आज आपल्यावर काय होतील? असा सांगोपांग विचार करून कलाकृती निर्माण केली जाते.
एखाद्यावर टीकाच करायची असती तर त्यासाठी दूरचित्रवाहिनीवरील चर्चांसारखे अनेक पर्याय आहेत, त्यासाठी कोणी शंभर कोटी रुपये खर्चून सिनेमा का करेल? असा प्रतिप्रश्न करत कंगनाने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या निर्मितीमागची आपली भूमिका सविस्तर विशद केली. कंगनाचा हा बहुचर्चित चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता, मात्र, लोकसभा निवडणुकीत कंगनाला भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून उमेदवारी मिळाली. त्या वेळी प्रचारात आणि मतदारसंघातील कामात व्यग्र असल्याने कंगनाने चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं होतं. अखेर आता हा चित्रपट ६ सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.