Malvika Sharma Beef Question Controversy: फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना चित्रपटांच्या प्रमोशननिमित्त बरंच फिरावं लागतं. काही वेळा त्यांना विचित्र अनुभव येतात. बरेचदा त्यांना असे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. अभिनेत्री मालविका शर्मा हिच्याही बाबतीत असंच काहीसं घडलं. मालविकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिला गोमांस खाण्याबद्दल थेट विचारण्यात आलं.
मल्याळम चित्रपट ‘खलीफा: द इंट्रो’ च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री मालविका शर्माला एका विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. प्रमोशन इव्हेंटमध्ये एका रिपोर्टरने तिला थेट बीफ (गोमांस) खाण्याबद्दल प्रश्न विचारला. उत्तर भारतीय असलेली आणि महाराष्ट्रात राहणारी मालविका या प्रश्नामुळे थोडी अवघडली, मात्र तिने अत्यंत शांतपणे उत्तर दिले.
तुला गोमांस आवडतं का? मालविका शर्मा म्हणाली…
एका रिपोर्टरने मालविकाला विचारलं की, ‘तुला बीफ (गोमांस) आवडतं का?’ या प्रश्नामुळे मालविका अस्वस्थ झाली. पण त्यानंतर तिने सांगितलं की ती मांसाहार करत नाही. मालविका म्हणाली, “मी शाकाहारी आहे, त्यामुळे मी कधीच बीफ खाल्लेले नाही.” मालविकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत असून, असा प्रश्न विचारणाऱ्याला ट्रोल केलं जात आहे.
मालविका शर्माचे चित्रपट
मालविका २७ वर्षांची आहे. ती मुंबईत राहते. तिने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तिने सुरुवातीला वकील म्हणून काम केलं, पण नंतर ती फिल्म इंडस्ट्रीत आली. मालविकाच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, तिने मल्याळम, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये ‘नेला तिकीट’ या चित्रपटातून तिने तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०२१ मध्ये ती ‘रेड’ या चित्रपटात दिसली. २०२२ मध्ये तिने ‘कॉफी विथ काधल’ या तमिळ चित्रपटात काम केलं. २०२४ मध्ये ती ‘भीमा’ आणि ‘हारोम हारा’ या चित्रपटांमध्ये झळकली होती.
मालविकाच्या ‘खलीफा: द इंट्रो’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. वैशाख दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, नील नितीन मुकेश, मालविका शर्मा आणि कयादू लोहार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनेते मोहनलाल यांचा कॅमिओ देखील पाहायला मिळणार आहे.
