मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार आहेत, ज्यात कुणी खऱ्या आयुष्यात इंजिनिअर आहे, कुणी वकील आहे, तर कुणी डॉक्टर. अभिनय क्षेत्रातल्या आवडीमुळे अनेकांनी कलाकार म्हणून एक वेगळी सुरुवात केली. मराठी कलाविश्वातही अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात डॉक्टर, वकील आहेत. यापैकीएक लोकप्रिय नाव म्हणजे, अभिनेत्री मयुरी देशमुख.
मयुरी देशमुख ही खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहे. पण डॉक्टर असूनही ती स्वत:च्या नावापुढे ‘डॉक्टर’ लावत नाही. नावापुढे ‘डॉक्टर’ न लावण्याबद्दल तिने काही दिवसांपूर्वी स्वत:च खुलासा केला होता. कुणीतरी कमी शिकलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून आणि एखादी व्यक्ती शिकलेली आहे म्हणून तिच्याकडे आदराने बघितलं जातं असल्याबद्दल तिला राग आहे. म्हणूनच तिने नावापुढे डॉक्टर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली होती? चला जाणून घेऊ…
“मला डॉक्टर असल्याचा अभिमान बाळगायचा नाही”
मित्र म्हणे या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “मुळात हे किती चुकीचं आहे की, कुठलं तरी एक टायटल लावल्यानं तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं. मला वाटतं तुमचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन सारखाच असायला हवा. मला याचाच राग आहे की, कुणीतरी कमी शिकलेलं आहे किंवा खालच्या सोसायटीमधून मधून आलेलं आहे म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं जातं आणि एखादी व्यक्ती शिकलेली आहे म्हणून तिच्याकडे आदराने बघितलं जातं. मला स्वत:ला मी डॉक्टर असल्याचा अभिमान बाळगायचा नाही. मला मी डॉक्टर असणं माझ्या लेखन क्षेत्रात मिरवायला आवडेल, तिथे मला एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. तिथे मला एक वेगळी ओळख आहे.”
“एखाद्या चश्म्यातून बघून मिळणारा सन्मान मला नको”
पुढे तिने “मला समाजाचा हा दृष्टीकोन आवडत नाही की, काही लोकांना तुम्ही आदराने बघता आणि काही लोकांकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघता. आपण अतिशय वाईट प्रवृत्तीचे डॉक्टर बघितले आहेत. पण तसंच आपण अतिशय सुंदर मनाचे कामगारही पाहिले आहेत. त्यामुळे मला तुम्ही एखाद्या चश्म्यातून बघणार असाल आणि सन्मान देणार असाल तर मला तो सन्मान नको आहे” असं स्पष्ट मत मांडलं होतं.
दरम्यान, मयुरीबद्दल सांगायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या लोकप्रिय मालिकेतून मयुरीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर ती काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या ती ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
