मराठी चित्रपट विश्वातून एक महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कर्करोग झाला आहे. याबाबतची माहिती मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. मेधा मांजरेकर यांनी दे धक्का, तसंच नटसम्राट यासह विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मेधा मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत कर्करोगावरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याचं चाहत्यांना सांगितलं. या पोस्टवर अनेकांनी चांगल्या आरोग्यासाठी मेधा मांजरेकर यांना सदिच्छा दिल्या आहेत.
काय आहे मेधा मांजरेकर यांची पोस्ट?
“काही काही प्रवास असे असतात जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. माझा हा प्रवास त्यापैकीच एक होता. पहिल्या टप्प्यातील ट्रिटमेंट संपत आली आहे आणि माझा वाढदिवसही येतो आहे. त्यामुळे आता मी मागे वळून पाहते आहे. तेव्हा मला जाणवतंय की, कर्करोगाचं निदान, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया , केमोथेरपी आणि रेडिएशन यापेक्षा अत्यंत कठीण काळात लोकांकडून मला मिळालेलं प्रेम, साथ आणि आशीर्वाद याचीच मला जास्त आठवण आहे. मी आता पाऊल पुढे टाकू शकणार नाही असं जेव्हा जेव्हा वाटलं त्या त्या वेळी माझ्या मदतीला कुणीतरी धावून आलं. देवानेच माझा हात धरुन मोठा आधार दिला. मी हा प्रवास एकटीने कधीच केला नाही. माझे गुरु, डॉक्टर्स, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि माझे पती महेश मांजरेकर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मला हा कठीण प्रवास पार करता आला.” असं म्हणत भावनिक पोस्ट लिहित मेधा मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

आज सगळ्या अदृश्य हातांची आठवण मला येते आहे-मेधा मांजरेकर
मेधा मांजरेकर म्हणतात आज मला त्या सगळ्या अदृश्य हातांची आठवण येते आहे ज्यांनी ज्यांनी माझी मदत केली. मला या प्रवासाने हेदेखील शिकवलंय की आईच्या आयुष्यात असाही येतो की आईला जाणीवही न होता तिची मुलं तिचा हात सोडतात. पण माझा हात मुलांनी घट्ट धरुन ठेवला होता. तु्म्ही सगळ्यांनी मला प्रेम, पाठिंबा, आपुलकी या सगळ्याची नव्याने ओळख घडवलीत. कायमच तु्म्ही सगळे माझ्या पाठिशी उभे राहिलात, माझ्यासाठी प्रार्थना केलीत. मी या संकटाला एकटीने तोंड देऊ नये म्हणून तुम्ही रोज प्रयत्न केलेत आणि मला साथ दिली. असंही अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
