‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सोनपरीचा सहभाग; प्रेक्षकांसाठी मृणाल कुलकर्णी घेऊन येणार खास भेट

आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

mrunal-kulkarni-planet-marathi

मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पदार्पणातच लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रत्येक भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनेक ऐतिहासिक भूमिकांना तिने एका वेगळ्याच उंचीवर नेले.

अभिनय, लेखन यासोबतच आपल्यातील दिग्दर्शनाला वाव देत तिने दिग्दर्शकाची भूमिकाही लीलया पार पाडली. मनोरंजन क्षेत्रातील अशी टॅलेन्टेड अभिनेत्री ‘प्लॅनेट मराठी’चा भाग असणाऱ्या ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे आता मृणाल कुलकर्णी आणि ‘प्लॅनेट मराठी’ एकत्र आल्याने काहीतरी जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की!

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवाराचा भाग झाल्याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणते, ”प्लॅनेट मराठी हे मराठी प्रेक्षकांचे हक्काचे पहिलेवहिले मराठी ओटीटी आहे. सिनेसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही त्याची जोरदार चर्चा आहे. ‘प्लॅनेट मराठी’ने अल्पावधीतच आपल्या शाखा रुंदावल्या आहेत आणि अशा परिवारात ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी मला सामावून घेतल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करते. एवढा मोठा प्लॅटफॉर्म पाठीशी असल्याने अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना बळ मिळेल हे नक्की.”

मृणाल कुलकर्णीचा ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सहभाग झाल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”मृणाल कुलकर्णींचा अभिनय क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. उत्तम कलाकाराबरोबरच ती उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. साहित्याचा वारसा लाभल्याने तिला साहित्याची उत्तम जाण आहे आणि तिच्या या गोष्टीचा फायदा ‘प्लॅनेट मराठी’लाही नक्कीच होईल.’प्लॅनेट मराठी’ सोबत मृणाल कुलकर्णी प्रेक्षकांसाठी लवकरच एक खास भेट घेऊन येणार आहे. आता ती भेट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress mrunal kulkarni now part of planet marathi ott kpw

ताज्या बातम्या