Parvathy Thiruvothu Child Harassment : समाजात वावरताना दुर्दैवाने आजही अनेक मुली, स्त्रियांना काही वाईट घटनांचा त्रास सहन करावा लागतो. मनोरंजन विश्वातल्या काही लोकप्रिय अभिनेत्रींनासुद्धा अशा वाईट घटनांना सामोरे जावे लागले आहे, याबद्दल अभिनेत्री व्यक्तही झाल्या आहेत. अशातच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीनं तिच्या लहानपणीची अशीच एक वाईट घटना सांगितली आहे.
अभिनेत्री पार्वती थिरुवोथुने एका मुलाखतीत लहानपणातील एका भयानक घटनेबद्दल सांगितले. लहानपणी तिला एका व्यक्तीनं छातीवर मारलं होतं, ज्याचा तिला खूप त्रास झाला होता आणि त्या आठवणी तिच्या मनात आजही तशाच आहेत. अशाच काही वाईट आठवणी तिनं मुलाखतीत सांगितल्या. तसंच पार्वतीने सांगितलं की, अशा घटना कोणत्याच मुली किंवा मुलाबरोबरसुद्धा घडू नयेत.
‘द मेल फेमिनिस्ट’ या कार्यक्रमात बोलताना, पार्वतीने सांगितले की, लहान वयातच तिच्याबरोबर छेडछाडीची घटना झाली होती आणि असे अनेक प्रसंग घडले आहेत. या घटनांबद्दल पार्वती म्हणाली, “आपण जन्म घेतो आणि नंतर शोषण सुरू होतं. ऑटोमध्ये बसत असताना कोणीतरी मला चिमटे काढत असे. मी माझ्या आईला रेल्वेस्टेशनवर सोडून परत येत असताना कोणीतरी माझ्या छातीवर जोरात मारलं. ते छेडणं किंवा वाईट स्पर्श नव्हता, तर जोरानं मारलेला मार होता. मी त्यावेळी लहान होते आणि मला आठवतंय की, तेव्हा खूप वेदना झाल्या होत्या.”
पार्वतीने पुढे सांगितले की, या सततच्या शोषण आणि छेडछाडीमुळे तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. या सगळ्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी तिच्या आईने तिला लहानपणापासूनच बाहेरच्या जगासाठी तयार केल्याचे तिने सांगितले.
ती म्हणाली, “मला माझ्या आईने रस्त्यावर कसे चालायचे ते शिकवले. बाहेर खरेदी करू नकोस असंही म्हटलेलं. पुरुषांच्या हातांकडे आणि त्यांची वागणूक पाहा, असा सल्ला दिलेला. कल्पना करा की जर एखाद्या आईला आपल्या मुलाला हे सर्व शिकवावे लागले तर काय होईल? आणि हो, अश्लील वागणूक… मी कितीतरी वेळा पुरुषांना माझ्यासमोर वाईट कृत्य करताना पाहिलंय. त्यावेळी मला काही समजलं नाही, पण फार नंतर कळलं की अशा घटनांचा, प्रसंगांचा आपल्या शरीरावर आणि मनावर किती परिणाम होतो.”
दरम्यान, पार्वती ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने ‘टेक ऑफ’, ‘उयिरे’, ‘करीब करीब सिंगल’, ‘चार्ली’, ‘मरियन’ आणि ‘बैंगलोर डेज’सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
पार्वतीच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती लवकरच ऋतिक रोशनच्या HRX फिल्म्स अंतर्गत बनत असलेल्या प्रोजेक्ट ‘द स्टॉर्म’मध्ये दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अजीतपाल सिंग यांनी केले असून, यात अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रामा शर्मा आणि सबा आजाद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
