महाराष्ट्रात सध्या प्रचंड दुष्काळ पडला आहे. महाराष्ट्रातल्या एकूण ३०६ तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाने ओढ दिल्याने आणि एल निनोच्या परिणामामुळे राज्यावर हे संकट राज्यावर आलं आहे दरम्यान दुष्काळ असल्याने राज्य सरकारने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसंच राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये १० टक्के पाणी कपातही लागू करण्यात आली आहे. धरणांमध्ये असलेला पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरण्यासाठी ऑक्टोबर महिन्यातच पाणी कपात लागू झाली आहे. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता हणमघरने एक व्हिडीओ पोस्ट करत शेतकऱ्यांचा मतांपुरतवा वापर व्यवस्थेने बंद केला पाहिजे असंही म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे प्राजक्ता हणमघरने?
“शेतकरी हवालदिल झाला आहे, सरकार संवेदनशील आहे का? आपण सगळे, आपलं, आपल्यापुरतं, आजच्या पुरतं यात मग्न आहोत. जी गोष्ट आपल्याला विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. शेतकऱ्यांनी स्वतःला जगवायचं, फळझाडं जगवायची, शेती जगवायची, जनावरांना जगवायचं, नक्की काय करायचं? मतांपुरता आता यांचा वापर व्यवस्थेने बंद केला पाहिजे. आपणही आपल्या बांधवांच्या मागे उभं राहणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.” असं प्राजक्ताने म्हटलं आहे.
दुष्काळ फक्त शेतकऱ्यांपुरता नाही, शहरांचे घसेही कोरडे पडलेत
प्राजक्ता पुढे म्हणते, “गेल्या वर्षी महापूर आला, पाण्याने नासवलं सगळं. त्याच पाण्याने फसवलं आहे यावर्षी. फक्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे नाहीयेत आपल्याला. तर अश्रूंच्या मागचे प्रश्न पुसायचे आहेत. हंगाम वाया चालला आहे, पेरण्या नाहीत. उद्या यामुळे तुमच्या माझ्या ताटातला घासही महाग होणार आहे. दुष्काळ फक्त शेतकऱ्यांपुरता नाही. शहरांचे घसेही कोरडे पडले आहेत. काय करायचं त्यांनी? दरवेळी दयेचा कटोरा घेऊन व्यवस्थेच्या पुढे जायचं का? या पार्श्वभूमीवर कसे सण आणि उत्सव आपण साजरे करतो आहोत? आपल्याच जवळचा एक समुदाय दुःखी आहे त्याबद्दल सहवेदनाही नाही आपल्याकडे. निसर्गाबद्दल, नद्यांबद्दल, मातीबद्दल कृतज्ञता केव्हा निर्माण होणार आपल्या मनात. विचार करूयात, खरंच याचा विचार करूयात.” असं तिने म्हटलं आहे.
खोटी भाकरी नाही निर्माण करू शकत आपण, असं म्हणत माझा शेतकरी, माझा पाठिंबा असा हॅशटॅग लिहून प्राजक्ता हणमघरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपण सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे. शेतकऱ्यांचा विचार नक्की केला पाहिजे असंही आवाहन प्राजक्ता हणमघरने केलं आहे.
