२००९ मध्ये आलेला ‘सागर इलियास जॅकी रिलोडेड’ हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट प्रचंड गाजेल अशी सर्वांना खात्री होती. मोहनलाल यांचा ‘इरुपथम नूटांडू’ (१९८७) या सुपरहिट चित्रपटाचा हा एक भाग होता आणि दिग्दर्शक अमल नीरद यांच्याबरोबर मोहनलाल पहिल्यांदाच काम करत होते. मात्र, उत्तम मेकिंग आणि मोहनलाल असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.

याच चित्रपटातून प्रयागा मार्टिन या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटातली तिची भूमिका लहान होती, पण मोहनलाल यांच्याबरोबरच्या सीनमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने ‘उस्ताद हॉटेल’ (२०१२) मध्येही लहान भूमिका साकारली. पुढे तिने मॉडेलिंगला सुरुवात केली.

नृत्याची आवड आणि अभिनयाची ओढ

प्रयागाने वयाच्या पाचव्या वर्षापासून नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. भरतनाट्यम, कुचीपुडी आणि मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्यांसह तिला ‘फ्रीस्टाईल’ नृत्याचीही आवड होती. शालेय जीवनात राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाल्यावर तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निश्चय केला.

‘पिसासू’मुळे मिळाली खरी ओळख

प्रयागाच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती २०१४ मध्ये. तमिळ दिग्दर्शक मिस्किन यांनी तिची एक जाहिरात पाहिली आणि तिला ‘पिसासू’ या तमिळ हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडले. या चित्रपटातील तिची भूताची भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर तिने मल्याळममध्ये ‘ओरू मुराई वंतू पार्थया’मध्येही मुख्य भूमिका साकारली. पुढे तिने ‘रामलीला’, ‘कट्टप्पनायिले ऋत्विक रोशन’ आणि ‘ब्रदर्स डे’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. तसेच तिने ‘गीता’ या कन्नड चित्रपटाद्वारे तिथेही आपली छाप पाडली.

करिअरमधील चढ-उतार

सुरुवातीला चांगलं यश मिळालं, पण तिचे नंतरचे मल्याळम चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. २०२१ मध्ये तिने ‘नवरसा’ या तमिळ वेब सीरिजमध्ये अभिनेता सूर्याबरोबर काम केले, पण या भूमिकेलाही प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

ड्रग्ज प्रकरणामुळे आलेली चर्चेत

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रयागाचे नाव एका ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आले. गँगस्टर ओमप्रकाश याच्या हॉटेल रूममधील पार्टीत प्रयागा आणि अभिनेता श्रीनाथ भासी उपस्थित असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. प्रयागाने हे सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की, ती ओमप्रकाशला ओळखतही नाही. पोलिसांनी या प्रकरणी तिची दोन तास चौकशी केली. अखेर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिसांनी या प्रकरणात प्रयागाला ‘क्लीन चिट’ दिली.

अभिनेत्री सध्या काय करतेय?

अभिनेत्री प्रयागा मार्टिन आता आपल्या आरोग्यावर, फिटनेसवर लक्ष देत आहे. याबद्दलचे अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसंच प्रयागाने सोहन सीनूलाल दिग्दर्शित ‘डान्स पार्टी’ (Dance Party) सारखे काही नवीन चित्रपट साईन केले आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिथे. ती तिचे दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते.