Priya Berde Recalls Late Night Horror Experience : मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. मराठीसह हिंदीतही त्यांनी काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्या स्टार प्रवाहवरील ‘काजळमाया’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. अशातच आता त्या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘भुल भुलैय्या’ नाटकानिमित्त प्रिया बेर्डे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. याच नाटकाच्या निमित्ताने प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत त्यांचा भीतीदायक अनुभव शेअर केला.
लाईमलाइट यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात त्यांना भीतीदायक अनुभवाबद्दल विचारण्यात आलं. यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “मला अनेक भयावह अनुभव आले आहेत. त्यापैकी एक आठवतोय तो म्हणजे, मी एकदा पुण्याच्या पुढे गावात शूटिंग होते आणि तिथून मला दुसऱ्या गावात जायचं होतं. तर तिकडे जाताना रस्त्याच्या एका बाजूला झाडी होती आणि दुसऱ्या बाजूला पाणी होतं. तो रस्ताही अगदी छोटा होता. खूप अंधारही होता. आजूबाजूला सात-आठ घरांची छोटी-छोटी खेडी होती. रात्री साडे अकरा-बाराच्या दरम्यान, मी जात गाडी चालवत असताना मला गाडीत डाव्या बाजूला पाठीमागे कुणीतरी बसलं आहे असं वाटलं. मी इतकी घाबरले की, मला घाम फुटला.”
“सरळ गाडी चालवतान असताना काहीतरी हालचाल झालेली मला जाणवली. मी खूप घाबरले. मी लगेच स्वामी समर्थ आणि दत्त गुरूंचा धावा सुरू केला. श्री गुरुदेव दत्त… श्री गुरुदेव दत्त… म्हणत होते. पण तेव्हा मला स्तोत्रही आठवेनात. मोजून दोन-तीन मिनिटांचा तो अनुभव होता. त्यानंतर सगळं शांत झालं. सगळं नॉर्मल झाल्यानंतर मी मागे वळून बघितलं तर कुणीही नव्हतं. पण ती आधीची दोन-तीनं मिनिटे खूप भीतीदायक होती. त्यानंतर मी रात्रीची गाडी चालवणे सोडून दिलं. मी आता रात्री साडेदहा-अकरानंतर कुठेही ड्राइव्ह करत नाही. कितीही घाई असूदे पण मी तेव्हापासून मी रात्रीचा प्रवास करतच नाही. त्यातलं खरं काय, खोटं काय, मला माहीत नाही. तो भास होता की काय होतं, माहीत नाही. पण त्याक्षणी मला भीती जाणवली होती. पण त्या भीतीदायक वातावरणातून स्वामी आणि दत्त महाराजांनी बाहेर काढलं असं मी म्हणेन.”
शेवटी त्या म्हणाल्या, “प्रवासादरम्यान, बाहेर गावी, नाटकांच्या दौरे वगैरे करताना असे अनुभव अनेकांना येत असतात. लोक म्हणतात असं काही नसतं. पण जशी सकारात्मक ऊर्जा असते; तशीच नकारात्मक ऊर्जासुद्धा असते. पण आपण डोळ्यांनी बघत नाही किंवा अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास बसत नाही. मीसुद्धा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं नव्हतं. पण मला मला काहीतरी हालचाल होतेय असं जाणवलं होतं. पण ठीक आहे. त्याला कुणी भास म्हणू किंवा आणखी काही… आपण ते आता सोडून देऊ…”
