Actress Shakila on Spine Surgery : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अडल्ट सिनेमांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शकीला सी. बेगम सध्या तिच्या गंभीर आजारपणामुळे चर्चेत आली आहे. मोबाईल, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि प्लेस्टेशनवर रोज ४ ते ५ तास एकाच कुशीवर पडून गेम खेळल्याने शकीलाच्या मानेच्या डिस्कचा गंभीर त्रास सुरू झाला. अखेर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून तिच्या मानेच्या दोन मणक्यांमध्ये टायटॅनियम चिप बसवावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपये खर्च आल्याचे सांगत शकीलाने पालकांना मुलांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवण्याचे आणि अनावश्यक फोन न वापरण्याचे आवाहन केले आहे.
‘माईलस्टोन मेकर्स’ला दिलेल्या मुलाखतीत शकीलाने सांगितलं की, या सवयींमुळे तिला मानेतील ‘डिस्क’चा त्रास सुरू झाला आणि शेवटी ऑपरेशन करावे लागले. “मी मोबाईल आणि प्लेस्टेशनवर रोज ४ ते ५ तास गेम्स खेळायचे आणि इन्स्टाग्राम-यूट्यूबवर व्हिडीओ पाहायचे. मला गेम खेळायला खूप आवडायचं, गेम खेळून मला आनंद मिळायचा, पण पलंगावर एकाच कुशीवर तासनतास पडून राहण्याच्या या सवयीचा माझ्या मणक्यावर गंभीर परिणाम झाला. मला खूप त्रास होऊ लागला, तेव्हा मी हॉस्पिटलला गेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं,” असं शकीला म्हणाली.
मी ओढवून घेतलेला खर्च – शकीला
ऑपरेशनशिवाय हा त्रास बरा होणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी तिच्या मानेच्या दोन मणक्यांच्या मध्ये एक टायटॅनियम चिप बसवली आणि ती स्क्रूने फिक्स केली. या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपये खर्च आला. “दोन हाडांच्या मधून काहीतरी बाहेर आलं होतं. डॉक्टरांनी तिथे टायटॅनियम चिप बसवून ती स्क्रूने घट्ट केली. खरं तर हा खर्च मी ओढवून घेतलेला आहे. खर्चाचंही सोडा, पण त्यामुळे होणारा त्रास असहनीय असतो,” असं शकीला म्हणाली.
अभिनेत्रीने फोन वापरण्याबद्दलही लोकांना सावध केलं. पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवावं, असं आवाहनही शकीलाने केलं. “फोनचा वापर फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच करा. अनावश्यक व्हिडीओ पाहू नका. अगदी माझे व्हिडीओही पाहू नका. कामाचं काही असेल तरच पाहा. नाहीतर तुमचे ३ लाख रुपये जातील आणि तुम्हाला असह्य वेदनाही सहन कराव्या लागतील,” असं शकीलाने सांगितलं.
शकीला कोण आहे?
दाक्षिणात्य अभिनेत्री शकीला सी. बेगमला अडल्ट चित्रपटांमधून मोठी ओळख मिळाली. सुरुवातीला तिने चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका केल्या. त्यानंतर दिग्दर्शक आर. जे. प्रसाद यांच्या ‘किन्नारा थुंबीकल’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. अवघ्या १२ लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ४ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. या चित्रपटामुळे शकीला केरळमध्ये खूप लोकप्रिय झाली. नंतरच्या काही वर्षांत तिने मल्याळम चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्या काळात मुख्य प्रवाहातील मल्याळम चित्रपटांना उतरती कळा लागल्यामुळे शकीलाच्या चित्रपटांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली होती.
