एका अभिनेत्रीला तिची जन्म देणारी आई कोण? हेच माहीत नाही, असं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरंय. या अभिनेत्रीचं नाव श्रुती कृष्णा. या कन्नड अभिनेत्रीने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. याचबरोबर ती बिग बॉस कन्नडची विजेतीही ठरली होती. जवळपास ३ दशकांनंतरही इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या श्रुती कृष्णाला दोन आई आणि एक वडील आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व करिअरबद्दल जाणून घेऊयात.

श्रुतीचं मूळ नाव गिरिजा. तिचा जन्म रंगभूमी कलावंतांच्या कुटुंबात झाला. ‘मनोरमा ऑनलाइन’च्या वृत्तानुसार, तिचे वडील जी. व्ही. कृष्णा हे एका नाटक कंपनीचे मालक होते. त्यांनी त्यांच्याच नाटकाच्या ग्रुपमधील ‘राधा’ आणि ‘रुक्मिणी’ या जुळ्या बहिणींशी लग्न केलं होतं. या तिघांना मिळून श्रुती, अभिनेता शरण आणि उषा अशी तीन अपत्ये आहेत. विशेष म्हणजे, या तीन मुलांपैकी कोणतं मूल नक्की कोणत्या आईचं आहे, हे या कुटुंबाने अजूनही जगासमोर जाहीर केलेलं नाही. असं असलं तरी, त्या सर्वांचं नातं खूप घट्ट आहे. आपल्याला एक नव्हे तर दोन आईंचं प्रेम मिळालं, असं श्रुती अनेकदा सांगते.

गिरिजा नाव बदलून ठेवलं श्रुती

गिरिजाने १४ व्या वर्षी ‘नंबिद्रे नंबी बित्रे बिदी’ (१९९०) या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारून अभिनयात पदार्पण केलं. मग तिने ‘आसेगोब्बा मीसेगोब्बा’ हा चित्रपट केला. द्वारकीश यांच्या ‘श्रुती’ (१९९०) या चित्रपटात काम करत असताना तिने नाव आवडत नसल्याचं दिग्दर्शकांना सांगितलं. त्यावेळी दिग्दर्शकाने श्रुती हेच नाव वापरण्याचा सल्ला दिला. हे नाव आकर्षक वाटल्याने आणि मनोरंजन विश्वात इतर कोणत्याही मोठ्या कलाकाराचं हे नाव नसल्याचे गिरिजाने आपलं नाव बदलून ‘श्रुती’ ठेवलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि तिच्या करिअरला कलाटणी मिळाली.

कन्नड चित्रपटसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’

‘श्रुती’ चित्रपटाच्या यशानंतर श्रुती कृष्णाला चित्रपटांच्या अनेक ऑफर येऊ लागल्या आणि ती अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचली. कन्नडमध्ये लोकप्रियता वाढल्याने तिला तमिळ, तेलगू आणि मल्याळम इंडस्ट्रीतून ऑफर येऊ लागल्या. तिला ‘आघात’ (१९९४) चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला ‘कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला. कल्की’ (१९९६) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला ‘तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला. तिने चित्रपटांमध्ये भावनिक भूमिका जास्त केल्याने तिला ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हटलं जाऊ लागलं.

श्रुतीने पुढे अनेक महिलाप्रधान चित्रपट केले. टाइम बॉम्ब, थुंबिदा माने, मोजुगारा सोगासुगारा, वीरप्पा नायका, सूरप्पा, मुद्दिना मावा, हेट्टा करालू, कर्पूरदा गोम्बे, गट्टीमेला, रामा शमा भामा, अक्का थांगी, पुट्टक्कना हायवे, कल्पना आणि सिरिवंथा हे तिचे काही गाजलेले चित्रपट होय.

श्रुती कृष्णाचे दोन घटस्फोट

यशाच्या शिखरावर असताना श्रुतीने दिग्दर्शक एस. महेंद्र यांच्याशी लग्न केलं. तिने लग्नानंतरही चित्रपटांमध्ये काम केलं. पण, तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एस. महेंद्र यांच्याबरोबरचं तिचं लग्न ११ वर्षांनंतर मोडलं. या दोघांना गौरी श्रुती नावाची एक मुलगी आहे. यानंतर २०१३ मध्ये तिने पत्रकार आणि कवी चक्रवर्ती चंद्रचूड यांच्याशी दुसरं लग्न केलं, पण हे लग्न फक्त वर्षभर टिकलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

चित्रपटांबरोबरच श्रुती राजकारणातही सक्रिय आहे आणि भाजपाची सदस्य आहे. तिने कर्नाटक महिला व बालविकास महामंडळ आणि कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

श्रुतीच्या वडिलांनी दोन जुळ्या बहिणींशी लग्न केल्याने तिला दोन आईंचा सहवास लाभला. ती व तिच्या दोन्ही भावंडांना जन्म देणारी आई कोणती, हे अजून माहित नाही. “आम्हाला ते जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं नाही. जाणून घ्यायचं असतं तर सहज समजलं असतं. पण आम्ही वेगवेगळे नाही, आम्ही सगळे एकच आहोत असे मानतो. ज्यांना आमच्या कुटुंबातील एकोपा आणि प्रेम समजत नाही, तीच लोकं अशा गोष्टींबद्दल काळजी करतात. त्या दोघी आमच्या आई आहेत. त्या आमच्यावर सारखंच प्रेम करतात आणि आम्हीही त्यांच्यावर तितकंच प्रेम करतो. कोण कोणाचं मूल आहे, असा कोणताही फरक आमच्यात नाही. मग विनाकारण भेदभाव कशाला करायचा?” असं श्रुती म्हणाली होती.