लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे हिने या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये स्काय डायव्हिंग करताना तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारण्याचा उपक्रम केला आहे. असे धाडसी पाऊल उचलत तिने जागतिक महिला दिन साजरा केला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळे करण्यासाठी स्नेहल तरडे व त्यांच्या मैत्रिणींनी सिडनीमध्ये तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारत स्काय डायव्हिंग केले आहे. त्यांच्यासह अनिता पाटील आणि रूपाली पवार या त्यांच्या मैत्रिणींनीही स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवला. ‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो… मी उडी मारणार… जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ असं म्हणत स्नेहल स्काय डायव्हिंगसाठी सज्ज झाली आणि तब्बल १५ हजार फुटांवरून त्यांनी उडी मारली. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी बिनधास्त उडी मारली अन् महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला. स्नेहल तरडे हिने धर्मवीर मु. पोस्ट ठाणे आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.