प्रसंग आला पण..

अकरावीला पहिलं पाऊल कॉलेजमध्ये टाकलं आणि नाटय़विभागात ऑडिशन द्यायला गेले.

शब्दांकन : मितेश जोशी

कॉलेज आठवणींचा कोलाज – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

मी पुण्यात फग्र्युसन महाविद्यलयातून राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवली. दहावीला असल्यापासूनच माझ्या मनात फग्र्युसन महाविद्यालयाविषयी, तिथल्या सांस्कृतिक वातावरणाविषयी आदर होता. त्यामुळे मी ठरवलं होत जाईन तर फग्र्युसनमध्येच. अकरावीला पहिलं पाऊल कॉलेजमध्ये टाकलं आणि नाटय़विभागात ऑडिशन द्यायला गेले. आता हसू येतं पण सीनियर मंडळींनी योग्य शब्दांत अपमान करून खाली जमिनीवर बसवलं. मला ऑडिशनमधून बाद केलं, त्यांना सुंदर दिसणारी सॉलिड अ‍ॅक्ट्रेस हवी होती. अकरावीला कॉलेज सुरू झालं आणि लगेच प्राध्यापकांचा संप सुरू झाल्याने पाच आठवडय़ांसाठी सुट्टी जाहीर झाली. कॉलेज घरापासून लांब होतं. सायकल चालवायची सवय व्हावी म्हणून व नाटय़ विभागात काम मिळावं म्हणून सुट्टीच्या दिवसातसुद्धा मी कॉलेजला जायचे.

अकरावी-बारावी मलानाटकात अभिनय करायला मिळाला नाही, पण मी बॅकस्टेज शिकले. मी पुण्यातली पहिली महिला लाईट डिझायनर आहे. पुरुषोत्तम करंडकमध्ये अभिनयासाठी मला नाकारण्यात आल्यावर नेपथ्य आणि कपडेपट सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतली. पुरुषोत्तम करंडकचे सर्वेसर्वा राजाभाऊ नातू, मधू जोशी यांच्या हाताखाली लाइट डिझाइन शिकले. फर्स्ट इयरपासून नाटकात काम करायला लागले. पंधरावीला तर मी दोन एकांकिका लिहिल्या आणि दोन्ही एकांकिका मी स्वत: दिग्दर्शितसुद्धा केल्या.

‘आम्ही खरेच निष्पाप होतो’ ही माझ्या आयुष्यात घडलेल्या एक सत्यघटनेवर आधारित एकांकिका होती. या एकांकिकेत मुग्धा गोडबोले मुख्य भूमिकेत होती. तिची ही पहिलीच एकांकिका होती आणि तिला अभिनयाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मी ‘मंजू’ नावाची मी दुसरी एकांकिका लिहिली. ज्या एकांकिकेला लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळी पारितोषिकं मिळाली.

कॉलेजमध्ये असताना मी लेक्चरला कमी, अँफी थिएटर आणि साहित्य सहकारमध्ये जास्त दिसायचे. डॉ. माधवी वैद्य आणि गं. ना. जोगळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजमध्ये साहित्य सरकार चळवळ चालायची. त्यांच्या हाताखाली अनेक उत्तम लेखक व कवी तयार झाले. अँफी थिएटर आणि आमच्या तालमी हाच माझ्यासाठी कट्टा.

मी औंधला बालकल्याण संस्थेत अकरावी ते पंधरावी अशी पाच वर्ष नोकरी केली. कारण आमच्या वेळी आता मिळते तसा पॉकेटमनी काही मिळायचा नाही. त्यामुळे कमवा आणि शिका हे तत्त्व घरोघरी पाहायला मिळायचं. माझा फग्र्युसन कॉलेजच्या आठवणींचा कोलाज जितका मोठा आहे तितकाच बालकल्याण संस्थेच्या आठवणींचा आहे. या ठिकाणी पुण्यातल्या सर्व अपंग मुलांच्या शाळा मनोरंजनासाठी यायच्या. त्यामुळे तिथले मूकबधिर, अंध, अपंग, मतिमंद विद्यार्थी हे माझे सवंगडी होते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं.

कॉलेजची पाच वर्ष अ‍ॅक्टिव्हिटीजनी गच्च भरलेली असायची. सकाळी ६.३० वाजता मी स्पोर्ट्ससाठी ग्राऊंडवर जायचे. ७.३० ते १२.३० कॉलेज त्यानंतर १ ते ४.३० औंधला नोकरी आणि ५.३० ते ९.३० भरतनाटय़म क्लास असा माझा दिनक्रम चालायचा. रोज काहीना काही तरी चालायचं. आता मागे वळून बघताना खरं तर नवल वाटतं की, तेव्हा इतकी एनर्जी आली कुठून?

कॉलेजमधली आताची मूलं जशी खाबूगिरी करतात तशी संधी मला फारशी मिळाली नाही. तेव्हा माझ्यावेळी वडापाव नुकताच जन्माला आला होता. त्यामुळे वडापाव खाण्यात स्वर्गसुख असायचं. आनंद ज्यूस बारमध्ये आम्ही नियमित जायचो. याचे मालक राजूशेठ यांनी आमचे खूप लाड केले. एक पावभाजी सहा जणांनी मिळून खाणं वा एक कप कॉफी पाच जणींनी मिळून पिणं काय असतं ते मी इथे अनुभवलं. नाटकाच्या तालमी संपल्यावर श्रमपरिहाराला आम्ही इथे जायचो. फग्र्युसनच्या गेटला लागूनच आयएमडीआर मॅनेजमेंट कॉलेजचं गेट आहे. आणि त्यांची कँटीन सुरुवातीलाच आहे. त्या कँटीनमध्ये मी सॅम्पल पाव हा पदार्थ खायला जायचे. फग्र्युसनला असूनसुद्धा मी वैशालीत फार काही गेले नाही. कारण मला तेव्हा ते काही परवडायचं नाही. कोणी पार्टी दिली तरच जाणं व्हायचं. मला आयुष्यात धाकड बनवण्याचा प्रसंग हा कॉलेजमध्येच घडला. त्याचं झालं असं, बारावीला असताना एकदा कॉलेज कॅम्पसमध्ये माझी एका माणसाने छेड काढली. मी बचावासाठी हात उचलला तर त्यानेच मला कानफटात मारली. लहान होते, एकटी होते, खूप घाबरले. पण राग आला होता. त्याच रागाच्या भरात मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याने माझ्या पोटात गुद्दा हाणला. नंतर तो माणूस पळायला लागला. तो पळायला लागल्यावर मी सुद्धा त्याच्या मागे संतापून पळायला लागले. सकाळी साडेसहाची वेळ.. जास्त विद्यार्थीसुद्धा नव्हते. एके ठिकाणी तारेचं कुंपण होतं. त्या दोरीवरून तो पलीकडे सटकला. ती तार माझ्या हाताला लागली, हातातून रक्त आलं तरीही त्याचा पाठलाग करत राहिले. इतक्यात एक कपल मॉर्निग वॉक करत होते त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांच्या मदतीनं मी त्या माणसाला पकडलं. आमचे उपप्राचार्य डॉक्टर वि. मा. बाचल कॅम्पसमध्येच राहायचे. माझ्या विद्यार्थिनीला हात लावतोस असं म्हणत त्यांनी एक कानाखाली शिलगावली! तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून तीन पोलिसांच्या गाडय़ा आल्या व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तक्रारीसाठी मी बाचल सरांबरोबर पोलीस स्टेशनला गेले. माझ्या आईबाबांकडे तेव्हा फोन नव्हता. माझ्या काकूच्या घरी मैत्रिणीने फोन केला व आईबाबांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. आणि सरतेशेवटी त्याच्यावर मी माझ्या आईबाबांनी आणि प्राचार्यानी तक्रार नोंदवली. तो प्रसंग आला.. पण मला निडरपणाही शिकवून गेला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress sonali kulkarni speak about her college days zws

ताज्या बातम्या