scorecardresearch

“शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट

“या चित्रपटात का नाकारले याचे उत्तर मला आजही मिळालेले नाही”, असे तेजस्विनीने म्हटले. 

tejaswini pandit sai tamhankar duniyadari
तेजस्विनी पंडित सई ताम्हणकर

‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत ‘दुनियादारी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र या चित्रपटाबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मोठा खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे.
आणखी वाचा : दुखापतीमुळे अमोल कोल्हे सक्तीच्या विश्रांतीवर, तेजस्विनी पंडितने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत

 या वेबसीरिजच्या निमित्ताने तेजस्विनीने एक मुलाखत दिली. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल खुलासा केला आहे. यात तिने तिचा अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास उलगडला आहे. “दुनियादारी’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने शिरीन ही भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती”, असा मोठा गौप्यस्फोट तेजस्विनी पंडितने यावेळी केला.

“मला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या आणि विविध धाटणीच्या भूमिका आल्या. मात्र त्यांना मी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे यामुळे माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. नाहीतर आज मी एका वेगळ्या ठिकाणी असते”, असे तेजस्विनी पंडितने म्हटले.
आणखी वाचा : “ज्यांना शिव्या घालायच्यात त्यांना…”, ‘रानबाजार’च्या बोल्ड सीनवरील ट्रोलिंगवर तेजस्विनी पंडितचं स्पष्टीकरण

मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या चित्रपटांच्या यादीच ‘दुनियादारी’ या चित्रपटाचं नाव नेहमीच घेतलं जाते. या चित्रपटासंदर्भातील तेजस्विनीने मोठा खुलासा केला आहे. ‘दुनियादारी’ हा चित्रपट त्यातील पात्र आणि कलाकारांमुळे गाजला. या चित्रपटात सई ताम्हणकरने सत्तरीच्या दशकातील शिरीन भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यामुळे सईच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली.

मात्र “सई ताम्हणकरच्या आधी ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती. शेवटी तुमच्या नशिबात जे लिहिलेलं असतं, तेच तुम्हाला मिळतं. जर एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली नसेल तर ती तुम्हाला मिळणार नाही”, असंही ती यावेळी म्हणाली. 

“दुनियादारी हा चित्रपट माझा होता. त्यात शिरीनचा रोल हा मला ऑफर करण्यात आला होता. पण १६ डिसेंबरला माझं लग्न होतं आणि त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे २० डिसेंबर पासून शूटींग सुरु होणार आहे. त्यावेळी संजय दादानं मला हातावर मेहंदी काढायची नाही, असं सांगितलं होतं. त्यामुळे मी स्वत: लग्न असताना मेहंदी काढली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी बाबांनी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली, त्यात कुठेही माझं नावं नव्हतं. त्यानंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं पण कुणीच नीट उत्तर दिली नाहीत. या चित्रपटात का नाकारले याचे उत्तर मला आजही मिळालेले नाही”, असे तेजस्विनीने म्हटले. 

आणखी वाचा : आठवणीतील स्मिता पाटील…! पाहा त्यांचे कधीही न पाहिलेले खास फोटो

दरम्यान ‘दुनियादारी’मध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी दोन आठवड्यांत या चित्रपटाने सव्वादोन कोटींचा पल्ला गाठला होता. तसेच तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 09:12 IST