सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. राजकीय विश्वात सुरु असलेला संघर्ष पाहता अनेकांनी याबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. कलाविश्वातील अनेक मंडळींनी महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकारणाबाबत आपल्याला काय वाटतं याबाबत आपलं मत मांडलं. आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं चक्क महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.




तेजस्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओची सुरुवात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संवादाने होते. या सीनमधील त्यांचा एक संवाद प्रचंड गाजत आहे. आणि तो संवाद म्हणजे “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही.” तेजस्विनी पंडितने सध्या सुरु असलेलं राजकीय वातावरण पाहून हा व्हिडीओ शेअर केला असल्याचंच दिसत आहे.
राजकारण, सत्तेवर असणारी माणसं याचं उत्तम चित्रण या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळतं. तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी याबाबत विविध कमेंट करायला सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीला योग्य असा हा व्हिडीओ असं अनेक जणांनी कमेंटद्वारे म्हटलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, “मला तरी असं वाटतं रानबाजार आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये फारसं अंतर नाही.”

या वेबसीरिजचे दिग्दर्शक आणि अभिनेते अभिजीत पानसे यांनी देखील फक्त ‘रानबाजार’ शब्द दिसेल अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली होती. ‘रानबाजार’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा अजूनही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. तसेच सुरुवातीला या सीरिजला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण आता मात्र उत्तम वेबसीरिज असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.