अभिनय क्षेत्रात दर दिवशी काही नवे प्रयोग करण्यात येतात. फक्त अभिनय शिकलेल्याच व्यक्ती या क्षेत्रात नावारुपास येऊ शकतात असं नाही. तर या कलेची जाण असाणाऱ्या एखाद्या कलाकारालाही इथे प्रसिद्धी मिळू शकते. या अशा प्रयोगशील क्षेत्रात नेहमी कॅमेऱ्यामागे राहणारा अनुराग कश्यपही कॅमेऱ्यासमोर येऊ लागला आहे. दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अनुरागने सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘अकिरा’ या चित्रपटात अभिनय केला होता. त्याआधी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, या चित्रपटातही त्याने अभिनय केला होता. पण, टिस्का चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याचा गैरवापर केला गेल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.
‘रॉयल स्टॅग बॅरेल’तर्फे निवड करण्यात आलेले चार लघुपट १९ व्या ‘जिओ मामी’ मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये सुजॉय घोषचा ‘अनुकूल’, चैतन्य ताम्हाणेचा ‘डेथ ऑफ अ फादर’, मानसी निर्मलचा ‘छुरी’ आणि नीरज घयवानचा ‘ज्युस’ या लघुपटांचा समावेश आहे.




यामधील ‘छुरी’ या लघुपटात अनुराग कश्यपनेही एक भूमिका साकारली आहे. त्याविषयीच सांगताना तो म्हणाला, “टिस्काने या भूमिकेसाठी विचारल्यामुळेच मी ‘छुरी’मध्ये काम करण्यासाठी तयार झालो. कारण याआधी मला तिचा ‘चटनी’ हा लघुपट फार आवडला होता. लघुपटांच्या दुनियेत ती जे काम करत होती ते मला फार भावलं होतं. त्यामुळे मलाही संधी दे असं मी तिला सांगितलं होतं. पण, तिला ते जमलं नाही. शेवटी तिने माझा गैरवापर केला.’ आपल्या अभिनयाचा गैरवापर केल्यामुळे अनुरागने हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
यावर आता टिस्का काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनुराग कश्यपची दिग्दर्शन शैली पाहता अवघ्या काही वर्षांत त्याच्या दिग्दर्शनाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे लघुपटांकडे पाहण्याचा त्याचा नेमका काय दृष्टीकोन असेल याविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांमध्येच उत्सुकता होती. त्याविषयीच सांगत अनुराग म्हणाला, ‘लघुपट हे कलाविश्वाचं भविष्य आहे. त्यातही या विभागात आता स्पर्धा प्रचंड वाढली आहे. येत्या काळात लघुपटांच्या माध्यमातून बरेच कलाकार नावारुपास येतील.’