Usha Nadkarni Praise Vijay Sethupathi : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयानं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चार दशकांहून अधिक काळ त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. मराठीसह हिंदी मालिका, सिनेमे, तसेच नाटकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता त्या एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

उषा नाडकर्णी या लवकरच ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहे आणि या सिनेमात उषा नाडकर्णींनी विजय सेतुपतीच्या आईची भूमिका साकारली आहे. ‘गांधी टॉक्स’ हा मूक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं. त्यादरम्यान अभिनेत्याचा साधा, मनमिळाऊ स्वभाव उषा नाडकर्णी यांना प्रचंड भावला. त्याविषयी बोलताना त्यांनी विजय सेतुपतीबद्दल मुलाखतीत कौतुकोद्गार काढले.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी त्या विजयचं कौतुक करीत म्हणाल्या, “माझा मित्र किशोर बेळेकरनं (दिग्दर्शक) मला खूप वर्षांआधी चित्रपटाची कथा सांगितली होती. आम्ही एकदा भेटलो होतो, तेव्हा त्यानं मला चित्रपटाची कथा ऐकवली होती. तेव्हापासूनच मी वाट बघत होते की, हा कधी एकदाचा चित्रपट करतोय. नंतर योग्य वेळ आली आणि त्यानं मला चित्रपट करतोय, असं सांगितलं. तेव्हा तो म्हणालेला की, तुम्हाला या (विजय सेतुपती) मोठ्या कलाकाराबरोबर काम करायचं आहे. हे ऐकून मला इतका आनंद झाला की, मी किशोरला म्हटलं की, चित्रपटात संवाद असो वा नसो; पण त्याच्या बाजूला बसायला मिळालं तरी चालेल.”

पुढे त्या म्हणाल्या, “विजयसारखा कलाकार मी अजूनपर्यंत पाहिला नाही. इतकं यश मिळवूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. तो अतिशय साधेपणानं राहतो. आम्ही ज्या घरात शूटिंग केलं. तिथे कुणी राहत नव्हतं आणि त्यामुळे त्या घरात खूप धूळ वगैरे होती. मी आजारी असल्याने झोपून असायचे; पण विजयसुद्धा आमच्याबरोबर जमिनीवर बसायचा. इतका मोठा स्टार असूनही तो कधी असं म्हणाला नाही की, मला खुर्ची द्या.”

उषा नाडकर्णींनी केलं विजय सेतुपतीचं कौतुक

त्यानंतर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “आमचं शूटिंग झाल्यानंतरसुद्धा मी त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे. तुझं वय किती? लग्न झालं आहे का? मुलं किती आहेत? ती काय करतात? असं सगळं काही विचारलं? माझ्या मुलाबरोबर मी बोलते तशाच गप्पा मी विजयबरोबरही मारल्या. विजय मला मुलासारखाच आहे. किशोर हा दिग्दर्शक माझा खूप चांगला मित्र आहे आणि विजय माझ्या मुलाचं काम करणारा चांगला अभिनेता आणि बरोबर बाकीचे अनेक उत्तम कलाकार. मला विजयबरोबर काम करून खूपच मज्जा आली.”