महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत आहेत. नुकतंच या मालिकेतील कलाकारांचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विशाखा सुभेदार यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी त्यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्या खांद्यावर दोन साड्या पाहायला मिळत आहे. यात त्यांच्या हातात भेटवस्तूंवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेश लिहिलेला एक कागद दिसत आहे. "काय बोलू… शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले… घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक card होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक" क्षण "आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला …! त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात.. लता मंगेशकर…! त्या कायम हास्यजत्रा पाहतात आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट." "मी ठार झालेय खरंतर… देवा अजून काय हवयं…! ह्यासाठी मी कायम. "महाराष्ट्राची हास्यजत्रा "ची आभारी असेन आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आणि सोनी मराठीचे देखील आभार… अमित फालके, अजय भालवणकर, आणि आमची संपूर्ण जत्रेची टीम आणि ह्या यशात तुझ्याशिवाय सम्या समीर चौगुले काहीही शक्य नव्हतं.. धन्यवाद.." अशा आशयाचे कॅप्शन विशाखा सुभेदार यांनी दिले आहे. दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडतात. याच निमित्ताने लता मंगेशकर यांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. तसेच या भेटवस्तूंवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेशही लिहिला आहे. लता मंगेशकर यांनी कशाप्रकारे कार्यक्रमाचे कौतुक केलं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे.