शहरी भागातील आधुनिक जीवनशैलीतील ज्या अनेक समस्या आहेत, त्यापैकी एक आहे दोन्ही कमावत्या आई-वडिलांच्या बाळांचा सांभाळ. स्वतंत्र राहणाऱ्या दाम्पत्यांना विशेषत: आईला आपले करिअर की मूल या द्विधा अवस्थेत राहावे लागते. मुलाला पूर्ण वेळ देता न येण्याचे सल बाळगत अनेक ओल्या बाळंतिणींना बाळंतपणाची रजा संपल्यावर पाय ओढत कार्यालय गाठावे लागते. पाळणाघरे, घरात पूर्णवेळ बाळांना सांभाळणाऱ्या मावशींनी बऱ्याच प्रमाणात आई-वडिलांचा ताण हलका केला आहे. पण या व्यवस्थेचेही अनेक कंगोरे आहेत, ते कंगोरे काहीसे उलगडण्याचा प्रयत्न ‘अडकित्ता’ या झी ५ वरील सिनेमात केला आहे.

कस्तुरी (सखी गोखले) आणि गौतम (सिद्धार्थ चांदेकर) हे टिपिकल कॉर्पोरेट कपल आहे. झोकून देऊन काम आणि उरलेला वेळ पार्टी, मजा करण्याची त्यांचीही कॉर्पोरेट संस्कृती आहे. त्यामुळेच आपल्याला बाळ होणार हे पचवणे त्यांना आधी कठीण जाते. पण मग ते त्या बाळाचे स्वागत करण्यास उत्सुक असतात. बाळ प्री-मॅच्युअर जन्मते, त्यामुळे त्याला जपावे लागते.

नोकरी की बाळ असा प्रश्न कस्तुरीसमोर येतो, पण मित्राच्या आईकरवी त्यांना मंगल (सई ताम्हणकर) नावाची मदतनीस मिळते. मंगल त्या तिघांच्या आयुष्यात आल्याने त्यांचा खूप मोठा भार हलका होतो. मंगललाही एक बाळ असतं, तेही प्री-मॅच्युअर असतं, त्यामुळे ती गौतम आणि कस्तुरीच्या बाळाला जिवापाड जपते. नंतर अशा काही घटना घडतात की त्यामुळे मंगल आणि कस्तुरी-गौतम यांच्या परस्पर विश्वासाला तडे जाऊ लागतात, धक्के बसतात. त्यातून हे तिघे कसे कात्रीत सापडतात, सावरतात, गोष्टी निभावून नेतात, ही या सिनेमाची कथा.

सिनेमात जीव ओतला आहे तो मंगलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरने. अत्यंत साधी, वरवर कोणतंही वैशिष्ट्य नसणारं पण बऱ्यापैकी खोली असणारं हे पात्र जितकं साधं दिसतं, तितकं साकारण्यास कठीण होतं. अनेक ठिकाणी ते संशयास्पदही वाटतं. या सर्व भावभावना सईने खूप आत्मविश्वासाने साकारल्या आहेत. तिची देहबोली, भाषा या पात्राला जिवंत करते.

तिला तितकीच उत्तम साथ अभिनेत्री सखी गोखलेने दिली आहे. तिने साकारलेली पहिलटकरीण आई, तिची बाळासाठी होणारी घालमेल चपखल दाखवली आहे. विशेषत: एका प्रसंगातील आपलं बाळ त्याला सांभाळणाऱ्या मावशीला बिलगून आहे आणि आपल्याकडे झेपावत नाही यातून आलेले प्रचंड सल, असुरक्षिततेची भावना सर्व मातांना जोडून घेणारी आहे.

पाळणाघरात राहणारी अनेक मुलं सुटीच्या दिवशी घरी जायला मागत नाहीत, हे त्यांचे आई-बाबा आनंदाने सांगत असले तरी आतून काहीतरी तुटलेलं असतं. ही वास्तवता सिनेमात पाहताना अनेक आई-बाबा स्वतःच्या अनुभवाशी ते जोडून घेतील. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका तशी साहाय्यक अभिनेत्याची अधिक होती. कारण सिनेमात अभिनयाची खरी जुगलबंदी सई आणि सखीत रंगते. आशय कुलकर्णी यानेही कस्तुरी आणि गौतमच्या मित्राची भूमिका चांगली साकारली आहे.

दिग्दर्शक आशुतोष परांडकर यांनी यापूर्वीही ‘जय मल्हार’सारख्या मालिका, ‘स्ट्रॉबेरी’ नाटकातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘अडकित्ता’ चा पालकत्वाचा तसा जुनाच वाटणारा विषयही वेगळ्या धाटणीने मांडताना ते यशस्वी झाले आहेत. सिनेमाचा शेवट जेव्हा एखादा दिग्दर्शक प्रेक्षकांवर सोपवतो, तेव्हा ती कलाकृती प्रेक्षकांच्या मनात पुढचा अनेक काळ रेंगाळत राहते. ‘अडकित्ता’ पाहून झाल्यावर त्यावर आपण प्रेक्षक म्हणून विचार करत राहतो.

नात्यांच्या भावनिक गुंत्यामध्ये अडकलेला हा ‘अडकित्ता’ प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणारा आहे.

अडकित्ता

दिग्दर्शक – आशुतोष परांडकर

ओटीटी – झी ५