डोंबिवलीतील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान आणि सत्कार करणारा ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार’ सोहळा रविवारच्या संध्याकाळी सहकुटुंब पाहण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनीने दिली आहे. डोंबिवली शहराला सांस्कृतिक परंपरा आहे. मराठी संस्कृती जोपासण्यात आणि तिचा प्रसार करण्यात डोंबिवलीकरांचा वाटा मोठा आहे. डोंबिवलीकरांच्या या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान सोहळा या पुरस्काराच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवर अनुभवता येणार आहे.
रविवारी मनोरंजनाचा दुहेरी धमाका स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांसाठी आणला आहे. २९ जूनच्या रविवारी दुपारी एक वाजता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ संध्याकाळी चार वाजता महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फक्त लढ म्हणा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे, तर संध्याकाळी सात वाजता ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार’ सोहळा प्रसारित करण्यात येणार आहे.  सन्मान, नृत्य आणि संगीत याचा तिहेरी संगम असलेल्या या सोहळ्यात मूळची डोंबिवलीकर अभिनेत्री सोनाली खरे हिच्यासह ऊर्मिला कानेटकर-कोठारे, जान्हवी प्रभू-अरोरा आणि प्रसन्नजीत कोसंबीकर आदी सहभागी झाले आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिजीत चव्हाण यांनी केले आहे.