मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांविषयी आपण नेहमीच ऐकतो. काल अशाच काही लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीठाण्यातील घोडबंदर येथे पकडले. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीच दिली आहे. उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहाथ पकडलं आणि चोप दिला. त्यानंतर त्यांनी या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये एक जण हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र, आता शिवसेना चित्रपटसेना अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही सगळी बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.

आदेश बांदेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत “काही ठिकाणी ठाणे येथे गैरकृत्य करणारी व्यक्ती ही शिवसेना चित्रपटसेनेची पदाधिकारी आहे, असे खोट सांगून चुकीची बातमी पसरविण्यात येत आहे. शिवसेना चित्रपटसेनेचे सर्वच पदाधिकारी अत्यंत जबाबदारीने वागत असतात. त्यामुळे कोणतीही दिशाभूल करू नका. असे गैरकृत्य करताना ठाण्यात पकडल्या गेलेल्या व्यक्तीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. तो शिवसेने चित्रपट सेनेचा पदाधिकारी नाही. तसेच ही खोटी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल सोबत याबाबतची तक्रार सायबर सेलला केली जाईल,” असा इशारा शिवसेना सचिव, शिवसेना चित्रपटसेना अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिला आहे.

 

काय आहे प्रकरण?

अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन काही व्हिडीओ शेअर केले होते. एका व्हिडीओमध्ये खोपकर यांनी संपूर्ण प्रकार काय आहे याची माहिती दिली. एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करुन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती. या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका देण्यात आल्याचं सांगितलं. मात्र हा रोल हवा असेल तर उद्या या चित्रपटाचे निर्माते उत्तर प्रदेश लखनऊमधून मुंबईत येणार आहेत. तर तुला त्यांना खूष करावं लागेल, तुला कॉम्प्रमाइज करावं लागेल. असं केलं तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल दिला जाईल असं या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचं खोपकर म्हणाले. या अभिनेत्रीने घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या लोकांना ट्रॅप करुन ताबडतोब पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितलं. घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर ही मुलगी गेली तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहचले. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला. या चौघांकडे कट्टेपण सापडलेत. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नाव असल्याचं खोपकर यांनी सांगितलं.