सध्याच्या घडीला मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. या साऱ्यामध्ये खलनायिका ठरत असलेली शनाया आणि तिची मैत्रीण इशा मात्र त्यांच्याच दुनियेमध्ये मश्गुल असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नुकताच या दोघींचा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे.
आदितीचा ‘यु अॅण्ड मी’ हा नव्या व्हिडिओ अल्बम युट्युबवर प्रदर्शित झाला आहे. या मालिकेतील इशाच्या भूमिकेत दिसणाऱ्या आदिती द्रविडसोबत याच मालिकेतील शनाया अर्थात रसिका सुनीलही या अल्बममध्ये दिसत आहेत.
अभिनेत्री-गीतकार आदिती द्रविडने या अगोदर झी टॉकीजसाठी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ हे गाणे लिहीले होते. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात ‘नमन तुला श्रीगणराया’ हे तिचे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं होतं. आता तिचे हे तिसरे गाणे रसिकांसमोर येत आहे. ‘यु अँण्ड मी’ हे गाणे आदितीने लिहीले आणि गायलेही आहे.
‘मी आणि रसिका चांगल्या मैत्रिणी आहोत. आपल्या मैत्रीला समर्पित करणारं एक गाणं घेऊन याव असं वाटतं होतं. त्यामुळे आपोआपच शब्द सुचत गेले. सई-पियुषने संगीतबध्द केलेल्या या गाण्याचं नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकरने केली आहे. युथफुल शब्द, त्यालाच साजेसे चित्रीकरण असल्यामुळे हे गाणे तरूणाईला आवडेल असं वाटतं, असं आदितीने म्हटलं आहे.