जाहिरातीतील आशय आणि त्याच्याशी जोडले गेलेले कलाकार यांच्यावरून अनेकदा वादाची राळ उडली आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातींची पद्धत मोठय़ा प्रमाणावर बदलली आहे. पूर्वी फक्त एखादे उत्पादन पोहोचवण्यापुरता कलाकारांच्या चेहऱ्याचा वापर केला जाई. आता अनेकदा जाहिरातीतून संबंधित उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवताना त्याच्याशी काही ना काही सामाजिक मूल्ये जोडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. अर्थात, नवीन विचार वा मूल्ये मांडताना अनेकदा पारंपरिक विचार वा प्रथांना धक्का बसतो आणि मग पहिल्यांदा त्या जाहिरातीशी जोडल्या गेलेल्या कलाकारावर टीका होते. तर कधी तरी त्याउलट समाजविघातक उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या कलाकाराला त्याच्या नैतिक – सामाजिक मूल्यांविषयी धारेवर धरलं जातं. अभिनेता अक्षय कुमार सध्या अशाच एका वादाला सामोरा गेला आहे..

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारची विमल इलायचीची जाहिरात टीव्हीवर झळकली. खरंतर या जाहिरातीशी अक्षयच्या आधी अजय देवगण आणि शाहरुख खान हे दोन कलाकार जोडले गेले आहेत. अजय आणि शाहरुखची विमल इलायचीची जाहिरात पहिल्यांदा झळकली, तेव्हा त्यांची खिल्ली उडवली गेली. त्यांच्यावर टीकाही झाली, मात्र ती गोष्ट ना त्या कलाकारांनी फारशी मनावर घेतली ना त्यांच्या चाहत्यांनी.. अक्षयच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. त्याला या जाहिरातीत पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, त्याचे कारण त्याची जनमानसात असलेली प्रतिमा. अनेक सरकारी योजनांचा चेहरा असलेल्या अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपण तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती कधीही करणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशा जाहिरातींसाठी कलाकारांना भरपूर पैसे दिले जातात, मात्र माझ्यासाठी ही पैशाची गोष्ट नाही. मी अशा चुकीच्या जाहिराती कधीही करणार नाही, असे त्याने म्हटले होते. जाहीरपणे अशी भूमिका घेतल्यानंतर अचानक विमल इलायची जाहिरातीत त्याचं दिसणं हे सहजी पटणारं नव्हतंच. त्याच्यावर समाजमाध्यमांवरून इतकी टीका झाली की लगोलग त्याने जाहीर माफी मागत आपण संबंधित जाहिरातीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. संबंधित जाहिरातीसाठी त्याने करार केला असल्याने काही काळ या जाहिराती टीव्हीवर दिसतील, हेही सांगायला तो विसरला नाही. या जाहिरातीतून मिळालेली आर्थिक कमाई तो दान करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

सध्या अशा जाहिरातींच्या बाबतीत आणखी एक सोयीचा मुद्दा कलाकारांच्या मदतीला धावून येतो. विमल इलायची ही थेट तंबाखूची जाहिरात नव्हे. ही कंपनी तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असली तरी त्यांच्याकडून थेट त्या उत्पादनाची जाहिरात केली जात नाही. त्याऐवजी त्याच्याशी संबंधित दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात केली जाते. ‘सरोगेट जाहिरात’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार खुद्द अमिताभ बच्चन यांनाही महाग पडला आहे. अमिताभ बच्चन यांनीही अशाच प्रकारे ‘कमला पसंद’ची जाहिरात केली होती. त्या वेळी त्यांच्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी संबंधित करारही रद्द केला आणि त्यासाठी मिळालेली मानधनाची रक्कमही कंपनीला परत केली. त्या वेळी अमिताभ यांनी दिलेल्या जाहीर निवेदनातही अशा पद्धतीच्या ‘सरोगेट अ‍ॅडव्हर्टायिझग’ आणि त्याच्या परिणामांची कल्पना आपल्याला नव्हती, असे स्पष्ट केले होते. आपल्याकडे तंबाखू वा मद्याची जाहिरात करण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेकदा मद्य विकणारी कंपनी सोडय़ाची जाहिरात करते. हा प्रकार आपल्याला नवीन नाही, मात्र कलाकारांना अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या जाहिरातींबद्दल माहिती नाही हे तथाकथित सत्य पचवणं कठीणच आहे. याबाबतीत अभिनेता अजय देवगणलाही प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने हा वैयक्तिक निवडीचा मुद्दा असल्याची भूमिका घेतली. एखादी गोष्ट वा उत्पादन चुकीचं असेल तर ते मुळातच विकलं जाता कामा नये. तुम्ही कोणतीही गोष्ट करताना ती किती नुकसानदायी आहे याचा विचार करता. काही गोष्टी या हानीकारक असतात, काही नाही. मी फक्त इलायचीची जाहिरात करत होतो, असं त्याने स्पष्ट केलं. कित्येक कलाकारांनी अशा वादांना वा टीकेला उत्तर न देता आपापल्या जाहिराती सुरू ठेवल्या. हृतिक रोशन, रणवीर सिंग, संजय दत्त, टायगर श्रॉफ, सलमान खान.. ही यादी भली मोठी आहे.

योग्य की अयोग्य..

एखादा मोठा कलाकार जेव्हा संबंधित उत्पादनाची जाहिरात करतो तेव्हा त्यांनी त्याची योग्य-अयोग्यता तपासून घेतली आहे, असा एक समजही प्रचलित आहे. त्यामुळेही अनेक कलाकारांना वादांना तोंड द्यावे लागले आहे. गोरा रंग हवा हा सोस जाहिरातींमधून आणखी वाढतो आहे हे काही संवेदनशील कलाकारांनीच लक्षात आणून दिल्यानंतर देशभरात फेअरनेस क्रीम उत्पादनांविरोधात टीकेची झोड उठली. अभिनेत्री यामी गौतम ही गेली कित्येक वर्षे एका फेअरनेस क्रीमशी जोडली गेली होती, तिच्यावर टीका झाली. त्याच वेळी शाहरुख खाननेही पुरुषांना गोरं बनवणाऱ्या तथाकथित पहिल्या फेअरनेस क्रीमची जाहिरात केली होती, त्याच्यावरही प्रचंड टीका झाली. या टीकेचा फायदा असा झाला की उत्पादनांच्या जाहिराती थांबल्या नसल्या तरी गोरं बनवण्याचे दावे मात्र थांबले. अशाच कुठल्यातरी जुन्या तेलाच्या जाहिरातीमुळे अभिनेता गोविंदाही संकटात सापडला होता. शरीरासाठी अपायकारक घटक असलेल्या मॅगीची जाहिरात केली म्हणून अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका झाली.

जाहिरातींचा आशय पटला नाही म्हणून होणाऱ्या टीकेचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. ‘मान्यवर’च्या जाहिरातीतून ‘कन्यादान’ या संकल्पनेपेक्षा कन्येला आपलं माना, तिचा मान राखा, असा आग्रह धरण्यात आला होता. कन्यादानासारख्या जुन्या प्रथेची खिल्ली उडवणारी जाहिरात असल्याचा आक्षेप घेत अशी जाहिरात केल्याबद्दल आलिया भट्टला टीकेचे धनी केले गेले. तर कित्येकदा चित्रविचित्र पद्धतीने जाहिरात केल्याबद्दलही कलाकारांवर टीका झाली आहे. अंडरवेअर उत्पादनांच्या जाहिरातीसाठी टीका झालेले अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हे याचे ताजे उदाहरण आहे. याआधी अशाच जाहिरातीसाठी अभिनेता वरुण धवनवर कित्येकदा टीका करण्यात आली, मात्र अशा कुठल्याच टीकेला उत्तर देणे टाळत त्याने आपल्या जाहिराती सुरूच ठेवल्या होत्या. जाहिराती आणि कलाकार हे सध्याच्या काळातील अविभाज्य समीकरण असल्याने यापुढेही असे अनेक वादविवाद होत राहणार यात शंका नाही. असे वाद अनेकदा समाजाच्या दृष्टीने लाभदायक ठरल्याची उदाहरणे कमी नाहीत. अक्षय कुमारचे माफी मागणे हे त्याचेच फलित म्हणता येईल.