आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री आहे. २०२२ वर्ष तिच्यासाठी फार लकी ठरले आहे. या वर्षात तिचे ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्ज’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ असे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एका वर्षात १०० कोटींची कमाई करणाऱ्या ३ चित्रपटांमध्ये काम करणारी ती पहिली अभिनेत्री आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिने रणबीर कपूरशी लग्न केले. आलिया गरोदर आहे. तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तरीही या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कलेक्शन केले आहे. नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल ती म्हणाली की, “आम्ही सध्या नकारात्मक मतांपेक्षा सकारात्मक गोष्टींकडे पाहत आहोत. चित्रपटामध्ये सकारात्मक गोष्टी नसत्या, तर त्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर नक्कीच झाला असता.”

आलियाने ‘आरआरआर’मध्ये छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. ती एस.एस.राजामौलींच्या आगामी चित्रपटामध्ये महेश बाबूसह दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट समीक्षक ‘उमेर संधू’ यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये ते लिहितात, “एस.एस.राजामौलींच्या आगामी ‘एसएसएमबी29’ (SSMB29) या चित्रपटामध्ये आलिया भट्ट व महेश बाबू एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आलियाच्या बाळाच्या जन्मानंतर सुरु होईल.” दरम्यान टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये राजामौलींनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाला त्यांनी ‘ग्लोबट्रोटिंग अ‍ॅक्शनर’ (Globetrotting adventure) अशी उपमा दिली आहे.

आणखी वाचा – दिग्दर्शक अयान मुखर्जीने मानले शाहरुख खानचे आभार; म्हणाला “ब्रह्मास्त्रसाठी त्याने जे केलंय…”

या कार्यक्रमाला महेश बाबू देखील उपस्थित होता. राजामौलींसोबत काम करण्याबद्दल बोलताना त्याने ‘माझे स्वप्न सत्यात उतरले आहे’ असे म्हटले. तसेच “राजामौलींचा एक चित्रपट करताना २५ चित्रपट केले असे वाटते. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.” असेही तो म्हणाला.