‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि नुकताच पार पडलेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय यंदाच्या ऑस्करसाठी उत्सुक होते.ऑस्कर पुरस्कार पटकवल्यावर आता कलाकार मायदेशात परतत आहेत. अभिनेता जुनियर एनटीआर हैद्राबाद विमानतळावर दाखल झाला असताना त्याच्या चाहत्यांना मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक पत्रकारदेखील उपस्थित होते.
दाक्षिणात्य अभिनेत्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात ऑस्करसारखा पुरस्कार पटकावल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीन वाढ झाली आहे. जुनियर एनटीआर मायदेशात परताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तेव्हा त्याने माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. तो असं म्हणाला, एम एम कीरवानी व चंद्राबोस यांना ऑस्कर पुरस्कार स्वीकरताना बघणं हा एक उत्तम क्षण होता. मला अभिमान आहे मी ‘आरआरआर’ टीमचा सदस्य आहे. मी प्रत्येक भारतीयांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला पाठींबा दिला आणि पुरस्कार मिळाल्यावर आनंद साजरा केला. लोकांच्या प्रेमामुळे व चित्रपटसृष्टीमुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
‘आरआरआर’ टीमचं आणखीन एका गोष्टीसाठी कौतुक होत आहे ते म्हणजे या सोहळ्यातील त्यांच्या लूकमुळे, ऑस्करसाठी राम चरण व ज्यु. एनटीआरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक केला आहे. तर या सोहळ्यातील राजामौलींच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. राजामौलींनी ऑस्करसाठी खास देसी लूक केला आहे. पांढरे धोतर व गुलाबी रंगाचा कुर्ता अशा पारंपरिक पेहरावात राजामौली ऑस्कर सोहळ्यात दिसून आले.
राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.