सासू-सून हा विषय एका तथाकथित साच्यातूनच आपण चित्रपट-मालिका अशा विविध माध्यमांतून पाहात आलो आहोत. मात्र, आईच्या मायेचा पदर सोडून लग्नानंतर नव्या घरात प्रवेश केलेल्या स्त्रीला सासूकडूनही तीच मायेची सय अनुभवता येते का? बदलांचा हा प्रवास कसा असतो? या नात्यात गुंतलेल्या तिन्ही स्त्रीयांच्या मनात काय घालमेल होते? हे वास्तवातलं पण, पडद्यावर फारसं न अनुभवलेलं भावविश्व सध्या ‘झी ५’ वाहिनीवर ‘अगं आई, अहो आई’ या वेबमालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आई, ती आणि सासूची ही गोष्ट काय आहे, या विषयावर दिग्दर्शक वरुण नार्वेकर आणि निर्मिती सावंत, रेणुका शहाणे, हृता दुर्गुळे या तिन्ही अभिनेत्रींनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत गप्पा मारल्या.

नात्यांकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोन

‘अगं आई, अहो आई’ या वेबमालिकेची कथाकल्पना कल्याणी पंडित हिची आहे, असं दिग्दर्शक वरुण नार्वेकर याने स्पष्ट केलंं. ‘खरं तर एका मुलीचं लग्नानंतर तिच्या सासूबरोबर जुळत जाणारं नातं, तिचा सासूला ‘अगं आई’ म्हणून प्रेमाने संबोधण्यापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा असतो. एका सुनेचा हा प्रवास आणि त्याचबरोबर तिची आई आणि सासू यांच्यातही खुलत जाणारी मैत्री हे निरीक्षण कल्याणीने या कथेतून मांडलं होतं. त्यामुळे या तिन्ही व्यक्तिरेखा अनोख्या होत्याच, शिवाय या नात्यांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही वेगळा होता. आत्तापर्यंत दुर्दैवाने अत्यंत नाट्यमय गोष्टी दाखवायच्या म्हणून एका वेगळ्याच पद्धतीने आणि नकारात्मक दृष्टीनेच सासू-सुनेचं नातं रंगवण्यात आलेलं आहे. कल्याणीने खूप वेगळ्या पद्धतीने मैत्रीचं नातं रंगवलं आहे. इथे कुठलीही व्यक्तिरेखा वाईट नाही. काही प्रसंगच त्यांच्यासमोर असे येतात की त्या त्या परिस्थितीनुसार तिघींना काय पद्धतीने वागावं लागतं, हे दाखवण्यात आलं आहे. एकमेकांना दोष देण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न यात अधिक दिसून येतो, हे वेगळेपण असल्याने मला ही वेबमालिका करावीशी वाटली’, असं वरुणने सांगितलं.

जेन झीचं आकर्षण..

‘या वर्षभरात मी खरोखरच विविधांगी सासूच्याच भूमिका केल्या आहेत. या सगळ्या आत्ताच्या जेन झी पिढीशी जुळवून घेणार्‍या सासूच्याच व्यक्तिरेखा होत्या. परिस्थिती भिन्न असू शकते, स्वभाव भिन्न असू शकतात, तुम्हाला जुळवून घ्यायचं असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्याय कुठलेही निवडा, पण लग्नसंस्थेवर विश्वास ठेऊन लग्न करा, अशा पद्धतीचा संदेश या चित्रपटांमधून अगदी ‘अगं आई, अहो आई’ या वेबमालिकेतूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं,’ असं अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी सांगितलं. ‘मी बर्‍याचदा सकारात्मक व्यक्तिरेखा स्वीकारते. समाजात काहीतरी चांगला, सकारात्मक विचार पोहोचावा हा उद्देश त्यामागे असतो. अर्थात, खलनायक असल्याशिवाय नायक मोठा दिसत नाही, त्यामुळे त्याही भूमिका महत्त्वाच्या असतात. पण, तरीही आपल्याकडून सकारात्मक आशय लोकांपर्यंत पोहोचावा हा आग्रह कायम असतो’ असं त्यांनी सांगितलं. दुसरं मला स्वत:ला हे जाणवतं, आम्ही समवयस्क स्त्रिया ज्या सासू या नात्याने समाजात वावरत आहोत, त्यांना या जेन-झी पिढीतील मुलीचं एका अर्थी आकर्षण वाटतं. या मुली किती छान पद्धतीने स्वत:ला प्रेझेंट करतात, किती छान विचार करतात, त्यांच्याकडे किती ज्ञान आहे, हुशारी आहे, याचं त्यांना कौतुक वाटतं. तेच या वेबमालिकेतील कोल्हापूरकडच्या सासूचंही आहे. त्यामुळे ही भूमिका मला खूप आवडली, असं निर्मिती सावंत यांनी स्पष्ट केलं.

प्रेमळ सासू आणि खाष्ट आई…

‘प्रेमळ सासू आणि खाष्ट आई हे नेहमीपेक्षा एकदम व्यस्तच समीकरण या वेबमालिकेत आहे जे अनुभवायला खूप छान वाटतं’ असं  यात बर्‍यापैकी शिस्तप्रिय आणि मुख्याध्यापिका असलेल्या आईची भूमिका करणार्‍या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितलं. अनेकदा शिस्तीच्या बाबतीत आई इतकी आग्रही असते की मुलांच्या आयुष्यात शिस्त हवी यासाठीची तिची धडपड ही जमेची बाजू असली तरी कधीतरी त्यांना फक्त समजून घेणारी, प्रेम देणारी आईही हवी असते हे तिच्या लक्षातच येत नाही. वास्तव आयुष्यात माझी आई अशी नाही आणि मीसुद्धा तशी आई नाही. पण, एक वेगळीच छटा यानिमित्ताने अभिनित करायला मिळाली याचा आनंद वाटतो, असं त्यांनी सांगितलं.

कुठलंच नातं सरळ रेषेत पुढे जात नाही…

या वेबमालिकेत आजच्या तरुणीचं प्रतिनिधित्व करणार्‍या सुनेची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने केली आहे. या वेबमालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्या काही दिवस आधीच हृताचं लग्न झालं होतं. त्यामुळे नव्याने लग्न करून आलेल्या मुलीच्या मनात नवर्‍याच्या घरी आल्यावर काय विचार येतात, हे वास्तवात अनुभवलं होतं, असं तिने सांगितलं. कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात ‘अहो आई’ ते ‘अगं आई’पर्यंतचा हा प्रवास होतच असतो, असं ती म्हणते. कोणाचंही आयुष्य एका सरळ रेषेत पुढे जात नाही. तसंच, सासू-सुनेचंही आहे. कितीही गोड आणि आदर्शवत नात्याचा प्रयत्न केला, विचार केला तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांच्यातही वाद निर्माण होतात. कधीतरी सासूचा मुद्दा येतो, तिची पद्धत येते, तर कधी सुनेची येते. त्यातून मग सुवर्णमध्य काढून पुढची वाटचाल होत असते. आणि भविष्यात वैवाहिक नात्याची वीण घट्ट होण्यासाठी लग्नानंतरचे हे सुरुवातीचे दिवस अधिक महत्त्वाचे असतात, असं निरीक्षण नोंदवतानाच हा सगळा प्रवास या वेबमालिकेतून अनुभवता येणार असल्याचं हृताने सांगितलं.

रया त्यांचे दोषही बेधडकपणे मांडतात…

स्त्रीयांचं भावविश्व, त्यांच्या समस्या, त्यांचे विषय आपल्याकडे अनेक पुरुष साहित्यिकांनी, पटकथा लेखकांनी, चित्रपटकर्मींनी विविध अंगाने कलाकृतीतून उतरवले आहेत. मात्र, स्त्री लेखिका असेल तर स्त्रियांचे विषय अधिक तपशीलवार कलाकृतीत उतरतात, हे चौघांनीही मान्य केलं. स्वत: लेखिका-दिग्दर्शिका या दोन्ही भूमिकेतून वावरलेल्या रेणुका शहाणे यांनी स्त्री कलाकार आपले दोषही कलाकृतीत बेधडकपणे मांडू शकतात, असं निरीक्षण नोंदवलं. ‘स्त्रियांचे वेगवेगळे विषय मांडताना पुरुषांच्या मनात त्यांच्याप्रति आदरभाव असतो, संवेदनशीलता असते त्यामुळे काही गोष्टींवर थेट बोलण्यात अनेकदा हात आखडता घेतला जातो. मात्र, एक स्त्री जेव्हा इतर स्त्रियांबद्दल लिहिते तेव्हा त्यांच्या भावभावनांचे विविध कंगोरे, त्यांच्या नकारात्मक गोष्टींवरही ती स्पष्टपणे बोलू शकते. स्वत: स्त्री असल्याने दुसरं कोणी आपल्याला याबाबतीत बोल लावेल किंवा शंका घेईल, अशी भीती तिला वाटत नाही’ असं रेणुका शहाणे यांनी सांगितलं.