करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे देशातील शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण बंद झाल्यामुळे अनेक कलाकारांवर देखील अर्थिक संकट कोसळले होते. अग्नीपथ या चित्रपटात काम करणारे अभिनेते रेशम अरोरा यांच्यावर देखील आर्थिक संकट कोसळले आहे.

रेशम यांनी नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लॉकडाउनमुळे काम मिळणे बंद झाल्याचे सांगितले आहे. ‘माझ्यासाठी कामच नव्हते. लॉकडाउन सुरु झाल्यापासून ही अवस्था होती. अनेकजण म्हणत आहेत की आता सर्व काही ठीक होत आहे. पण मला अजूनही कामाच्या संधी दिसत नाहीत’ असे रेशम म्हणाले. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘काही वर्षांपूर्वी मी रेल्वेमधून पडलो होतो. त्यानंतर चिडिया घर मालिकेच्या चित्रीकरणावेळी काही कीटक माझ्या पायाला चावले. त्यामुळे मला हालचाल करण्यास त्रास होतो’ असे रेशम म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ‘मला खरच कामाची गरज आहे. CINTAAने माझी मदत केली पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मला कामाची गरज आहे. मला आर्थिक मदतीची गरज आहे.’ रेशम यांनी अग्नीपथ या चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी अनेका चित्रपटांमध्ये काम केले आहे.