अहमदाबाद न्यायालयाने ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन, केबीसीचा निर्माता सिद्धार्थ बासू आणि अन्य पाच जणांना बुधवारी दाखल झालेल्या एका याचिकेवरून नोटीस बजावली. ‘केबीसी’च्या जाहिरातीद्वारे वकिली पेशाचे मानहानीकारकरित्या सादरीकरण होत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
याबाबत शहरातील एक वकील दविंद्र सिंग राक्कड यांनी मुख्य शहर न्यायाधीश एस. व्ही. पारेख यांच्यासमोर याचिका दाखल केली. गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर सुरू असलेल्या केबीसीच्या प्रोमोमध्ये वकिली पेशाचे मानहानीकारकरित्या सादरीकरण केल्याचे या याचिकेमध्ये म्हटले आहे. न्यायाधीशांनी केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चनसह या प्रकरणाशी संबंधीत सर्व सात जणांविरुद्ध नोटीस बजावली असून, खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना २१ ऑगस्टपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची मुदत दिली आहे.
या प्रकरणाशी निगडीत सर्व सात जणांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राक्कडने आपल्या याचिकेत केली असून, पुरावा म्हणून राक्कडने या प्रोमोची सीडी न्यायालयासमोर सादर केली आहे.