कलाविश्वात विविध कारणांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सिलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांना न्याय दिला असून तिची प्रत्येक भूमिका गाजली आहे. त्यात २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रशंसनीय होती. मात्र या चित्रपटासाठी ऐश्वर्याऐवजी अन्य एका अभिनेत्रीच्या नावाचा विचार सुरु असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.
‘उमराव जान’ या चित्रपटामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. या चित्रपटामधील ऐश्वर्याचा अभिनय विशेष गाजला होता. मात्र या चित्रपटासाठी दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांनी ऐश्वर्याऐवजी प्रियांका चोपडाच्या नावाला पहिली पसंती दिली होती.
या चित्रपटात ऐश्वर्याने वठविलेली ‘उमराव जान’ची भूमिका महत्वाची होती.त्यामुळे या भूमिकेला प्रियांका न्याय देऊ शकते असं जे.पी.दत्ता यांच मत होतं. मात्र चित्रपटांच्या तारखांच्या अडचणीमुळे प्रियांकाने या चित्रपटाला नकार दिला. विशेष म्हणजे प्रियांकाच्या नकारामुळे हा चित्रपट ऐश्वर्याच्या पदरात पडल्याचं दिसून आलं. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावं तशी कमाई करु शकला नाही. मात्र हा चित्रपट नाकारल्याची खंत आजही प्रियांकाला वाटते.