दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांचा पहिला चित्रपट ‘मिन्नाले’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या रोमँटिक चित्रपटात आर. माधवन, रीमा सेन आणि अब्बास (मिर्झा अब्बास अली) मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अभिनेता अब्बासची चर्चा होत आहे. तमिळ इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉयला फ्लॉप चित्रपटांमुळे गरिबीत दिवस काढावे लागले. त्याचा प्रवास जाणून घेऊयात.

९० च्या दशकात अब्बास दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा होता. १९९६ मध्ये ‘काधल देसम’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केले आणि तो घराघरांत पोहोचला. ‘व्हीआयपी’, ‘पूवेली’, ‘पडयप्पा’ आणि ‘कंडुकोंडेन कंडुकोंडेन’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्याच्या करिअरला गती मिळाली. त्याने ऐश्वर्या रायसारख्या मोठ्या अभिनेत्रींबरोबरही काम केलं होतं.

अब्बासने फिल्म इंडस्ट्री का सोडली?

२००० च्या सुरुवातीला अब्बासच्या करियरला उतरती कळा लागली. लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याची लोकप्रियता कमी झाली. त्याला मुख्य भूमिका मिळणं बंद झालं आणि तो फक्त सहाय्यक भूमिकांमध्ये दिसू लागला. या अपयशामुळे त्याच्या करियरला फटका बसला. परिणामी त्याची आर्थिक परिस्थिती बिघडली.

“सुरुवातीला अहंकारामुळे मी दुसरं काम शोधले नाही. पण लवकरच माझी आर्थिक स्थिती बिकट झाली. मी निर्माता आर.बी. चौधरी यांच्याकडे कामासाठी गेलो, त्यांनी मला ‘पूवेली’ चित्रपटात संधी दिली. पण हळूहळू मला अभिनयाचा कंटाळा आला. मला कामात आनंद मिळत नव्हता. मला आठवतंय, माझा बॉलीवूड चित्रपट ‘अंश’ प्रदर्शित झाल्यावर मी माझ्या मित्रांना तो बघू नका असं सांगितलं होतं, कारण तो चित्रपट मला बकवास वाटला होता,” असं २०२३ च्या एका मुलाखतीत अब्बास म्हणाला होता.

शेवटी अब्बासने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो न्यूझीलंडला शिफ्ट झाला. तिथे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने बाईक मेकॅनिक म्हणून काम केलं आणि टॅक्सीदेखील चालवली.

अब्बास दहावीत नापास झाला होता, नंतर त्याचं ब्रेकअप झालं, यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. एकदा तो रस्त्याच्या कडेला उभा राहून टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करत होता, मग त्याला जाणवलं की त्याच्या या कृतीमुळे एखाद्या निष्पाप ड्रायव्हरचं आयुष्य बरबाद होईल. मग त्याने आत्महत्येचा विचार सोडला.

जवळपास एक दशक चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर अब्बास आता पुनरागमन करत आहे. तो जी.व्ही. प्रकाश कुमार याच्या एका कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.