बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री करिना कपूर खान ‘फिअर फॅक्टरः खतरो के खिलाडी’ रिअॅलिटी शोच्या फायनलला उपस्थित राहणार आहेत. या शोचे सूत्रसंचालन ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे.
सिंघमचा सिक्वल असलेल्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणास जोरदार सुरुवात झाली आहे. रोहित पहिल्यांदाच शोचे सूत्रसंचालन करत असून सिंघम २च्या प्रसिद्धीकरिता त्याने चित्रपटातील कलाकारांना शोच्या सेटवर बोलावले आहे. अजय देवगण ‘खतरो के खिलाडी’च्या विजेत्याचे नाव जाहीर करणार असून, ट्रॉफी प्रदान करणार आहे. राजनीश दुग्गल, निकीतन धीर आणि गुरमीत चौधरी यांच्यात फायनल रंगणार आहे.
अमोल गुप्ते आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका असलेला ‘सिंघम रिटर्न्स’ यंदा १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.