हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत खेळावर आधारित अनेक चांगले चित्रपट आले आहेत. ‘अव्वल नंबर’, ‘जो जिता वही सिकंदर’, ‘फुटबॉल शूटबॉल हाय रब्बा’, ‘दन दनादन गोल’, ‘चक दे इंडिया’, ‘स्टॅण्डबाय’ अशी अनेक उदाहरणं देता येतील. मराठीतही ही परंपरा चांगलीच आहे. मात्र या परंपरेत आतापर्यंत अस्सल मराठमोळ्या खेळांनाच स्थान मिळालं. यात कबड्डी, कुस्ती आदी खेळांचा समावेश होता. या प्रत्येक चित्रपटात आपल्या कमतरतांवर मात करत विजयाचा रस्ता शोधण्यात नायक किंवा नायिका यशस्वी होतात, हेच दाखवलं गेलं होतं. नुकताच प्रदर्शित झालेला ‘अजिंक्य’ हा बास्केटबॉलवर बेतलेला चित्रपटही नेमका याच गोष्टीवर प्रकाश टाकतो.
अनंत धर्माधिकारी (संदीप कुलकर्णी) हा अत्यंत चांगला बास्केटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आहे. त्याने घडवलेल्या संघाने गेल्या १७ वर्षांत १५ वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. मात्र सातत्याने मिळणाऱ्या या यशामुळे  त्याच्या स्वभावात नकळतच आलेला अहंपणा  केवळ खेळापुरता मर्यादित न राहता त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचाही भाग बनला आहे. खेळाकडे जरुरीपेक्षा जास्त लक्ष देणाऱ्या अनंतची बायको सई (कादंबरी कदम) ही सतत दुखावली गेली आहे. मात्र अनंतला तिची चिडचिड, तिला होणारा त्रास याची जाणीवच नाही. परिणामी सतत भांडणं होत राहतात.
यातच एकाच दिवशी बास्केटबॉलचा अंतिम सामना आणि सईच्या गायनॅकॉलॉजिस्टची अपॉइंटमेण्ट या गोष्टी एकत्र येतात आणि अनंत बास्केटबॉल सामन्याला महत्त्व देतो. त्यातच सई अनंतला त्याच्या अहंकारी स्वभावावरून छेडते. हा सामना आपला संघ हरला, तर आपण बास्केटबॉल खेळणं सोडून देऊ, असं अनंत सईला सांगतो. अनंतचा संघ बास्केटबॉलचा अंतिम सामना हरतो आणि अहंकारी स्वभावामुळे अनंत बास्केटबॉल सोडतो. या कुरबुरी खूपच वाढल्याने अनंत त्याच्या वरिष्ठांकडे (राजन भिसे) नागपूरहून औरंगाबाद येथे बदली मागून घेतो.
मात्र बास्केटबॉल त्याची पाठ सोडत नाही. त्याच्या आधीच्या क्लबमध्ये त्याची साहाय्यक प्रशिक्षिका असलेली भावना (सारिका निलाटकर-नवाथे) त्याला येऊन चिथावते. मग औरंगाबादमध्ये एका बंद पडलेल्या क्लबच्या कोर्टावर अनंत स्वखुशीने काही मुलांना बास्केटबॉलचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो. या प्रशिक्षणातही त्याचा हेकेखोर स्वभाव तसाच राहतो का, या दुराव्यामुळे सई आणि अनंत पुन्हा एकत्र येतात का, या संघाला बास्केटबॉलची स्पर्धा जिंकवून देण्यात अनंत यशस्वी ठरतो का, या सगळ्याची उत्तरं ‘अजिंक्य’ या चित्रपटात मिळतात.
‘अजिंक्य’ हा केवळ बास्केटबॉलवरील चित्रपट नसून आपल्यातल्या सगळ्या चांगल्या प्रवृत्तींना बरोबर घेऊन आपल्या अहंकाराशी चाललेला एका खेळाडूचा झगडा आहे. दिग्दर्शक तेजस देऊस्कर याने चित्रपटाची हाताळणी फ्लॅशबॅक व फ्लॅशफॉरवर्ड पद्धतीने केली आहे. चित्रपटात चालू असलेल्या प्रसंगाची सांगड अनंत मनातल्या मनात भूतकाळात घडलेल्या एखाद्या प्रसंगाशी घालत असतो. या पद्धतीत अनेकदा प्रतीकात्मकता खूप महत्त्वाची ठरते. दिग्दर्शकाला ती प्रतीके नेमकी सापडली आहेत.
अनंत औरंगाबादला एकाकी असताना त्याचे सहकारी त्याला बास्केटबॉलच भेट म्हणून देतात. बास्केटबॉल घेऊन तो बऱ्याच दिवसांनी कोर्टवर जातो. नेमका त्याच वेळी त्याच्या बायकोचा फोन येतो. त्याच्या आयुष्यातील दोन अत्यंत प्रिय गोष्टी त्याला एकाच वेळी सापडतात. त्याचप्रमाणे जितू नावाच्या मुलाशी गप्पा मारताना घरची जबाबदारीही पार पाडायची आहे आणि खेळही सोडायचा नाही. या जितच्या एका वाक्याचा परिणाम चांगलाच होतो. तसेच पक्या नावाचा मुलगा जेव्हा अनंतला ‘आम्ही बास्केटबॉल खेळतो, कारण आम्हाला तो आवडतो,’ असं ऐकवतो तो प्रसंगही चांगलाच  आहे.
अभिनयाच्या बाबतीत संदीप कुलकर्णीने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे.  कथा – तेजस देऊस्कर, पटकथा – तेजस देऊस्कर व गौतम पोद्दार, संवाद – तेजस देऊस्कर व प्रवीण तरडे, छायांकन – अभिजित अबडे, संगीत – सुस्मित लिमये, संकलन – अभिजित देशपांडे, कलाकार – संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर-नवाथे, अभिजित भोसले, केतन पवार, राघवेंद्र तुपेकर, सोजस थारकुडे, सिद्धेश, अक्षय, अभिजित जोशी, शाश्वत पाठक व इतर.