Marathi Actor Shares Memories of Sankarshan Karhade : छोट्या पडद्यावरील ‘विठू माऊली’, ‘मन उडू उडू झालं’सारख्या लोकप्रिय मालिका तसेच काही मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. परभणीमधून मुंबईत येऊन अजिंक्यने मनोरंजन क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. अजिंक्यप्रमाणेच परभणीमधील आणखी एक अभिनेता मराठी कलाविश्वात सक्रीय आहे, तो म्हणजे संकर्षण कऱ्हाडे.

संकर्षण आणि अजिंक्य यांनी परभणीतल्या बाल विद्या मंदिर या शाळेतून शिक्षण घेतलं आहे. याबद्दल अजिंक्यने नुकतीच एक जुनी आठवण सांगितली आहे. नेमकं काय म्हणाला अजिंक्य राऊत? चला जाणून घेऊ…

महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला, “कला क्षेत्रात येण्याची माझी लहानपणापासूनच इच्छा होती. मी बालपणी अंगणात गाणं वगैरे लागलं की डान्स करायचो. तेव्हा माझे आजोबा म्हणायचे की, तुला इथे नाही टीव्हीमध्ये जायचं आहे. तेव्हाच ते कुठेतरी माझ्या मनात बिंबलं गेलं. पण घरच्यांच्या म्हणण्यानुसार प्लॅन बी म्हणून मी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं. पण या पूर्ण प्रवासात माझी अभिनेता व्हायची इच्छा होतीच. शाळेत असताना स्नेहसंमेलनात काही परफॉर्म केलं होतं. वक्तृत्व स्पर्धेत वगैरे बक्षीस मिळालं होतं. शाळेत सुद्धा काही संस्कार घडत गेले.”

अजिंक्य राऊतने सांगितली संकर्षण कऱ्हाडेची आठवण

यापुढे तो म्हणाला, “मी परभणीच्या बाल विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. त्याच शाळेत संकर्षण कऱ्हाडेसुद्धा शिकला आहे. तो मी जायच्या आधीच दहावी पासआउट झाला होता. त्यानंतर मी त्या शाळेत गेलो होतो. मी कुठल्याही भाषणात बक्षीस जिंकलं, डान्स केला किंवा काहीही परफॉर्मन्स केला तर कुठले ना कुठले शिक्षक हेच म्हणायचे की ‘अरे हा तर संकर्षणच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे चालला आहे’. तेव्हा मला असं वाटायचं की, कोण आहे हा संकर्षण कऱ्हाडे? त्यानंतर ते मराठीतले लोकप्रिय अभिनेतेसुद्धा झाले आणि आता त्यांचा सर्वांनाच अभिमान आहे. नंतर मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो तेव्हा असं वाटलं की, किती क्रिएटीव्ह माणूस आहे. किती चांगला स्वभाव आहे. इतकं काम करून आणि झीचा लाडका चेहरा किंवा अभिनेता असूनही ते किती नम्र आहेत.”

दरम्यान, अजिंक्य आणि संकर्षण दोघेही मराठीतले लोकप्रिय अभिनेते आहेत. दोघांनी मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, संकर्षण सध्या नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर अजिंक्यचा लवकरच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.