Ajit Pawar Passes Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना त्यांचं विमान कोसळलं. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीचे समर्थकांवर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांच्या निधनानबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानावर मराठी कलाविश्वातूनही कलाकारांनीसुद्धा पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच मराठी अभिनेता रितेश देशमुखनं अजित पवारांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यानं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये रितेश म्हणाला, “अजित दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. या बातमीनं अतिशय दुःख झालं आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रभावी नेत्यांपैकी एक होते. कामात हलगर्जीपणा त्यांना कधीच मान्य नव्हता. प्रत्येकाला अधिक चांगलं काम करण्यासाठी ते सतत प्रेरणा देत असत.”
यापुढे रितेश म्हणाला, “अजित पवार नेहमी स्पष्ट आणि ठाम शब्दांत बोलत. संपूर्ण राज्यात ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक मोठं नेतृत्व गमावलं असून, ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे. मला त्यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या आपुलकी आणि माणुसकीमुळे ते कायम लक्षात राहतील. पवार कुटुंबीय, त्यांचे आप्तस्वकीय आणि समर्थकांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit… pic.twitter.com/nGQ3M1xf0Z
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 28, 2026
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनावर सायली संजीवनं “ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे…अजित दादा तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे…भावपूर्ण श्रद्धांजली” असं म्हटलंय. गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनीसुद्धा “विश्वासचं बसत नाही…अजितदादा” म्हणत श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासह कपिल होनरावनं, “अत्यंत अस्वस्थ करणारी आणि मनाला हादरवणारी बातमी आहे” असं म्हणत दु:ख व्यक्त केलं आहे.
गायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, हेमांगी कवी, नम्रता संभेराव, तेजश्री प्रधान, प्रथमेश परब, शुभांगे गोखले सुमित पुसावळे, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि अशा अनेक मराठी कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.
