Rahul Vaidya Shares Video of Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्रासह संबंध देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. अजित पवारांचे व्यक्तिमत्व लोकप्रिय असे होते. त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी आंदराजली वाहिली. तसेच राजकारणाबाहेरील व्यक्तींनीही अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. गायक राहुल वैद्यनेही अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. राहुल वैद्यने अजित पवारांचा डिसेंबर २०२५ रोजीचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यादिवशी अजित पवार सलग दोन तास गाणी ऐकत होते, असे कॅप्शन राहुल वैद्यने या व्हिडीओला लिहिले आहे.
राहुल वैद्यने आपल्या इन्स्टाग्रामवर सदर व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये राहुलने लिहिले, “ही ६ डिसेंबर २०२५ रोजीची घटना आहे. अजितदादा त्या दिवशी २ तास न थांबता एकामागून एक त्यांच्या आवडत्या गाण्यांची मागणी करत होत. मला कधीच वाटले नव्हते की, ही त्यांची शेवटची भेट असेल. त्यांचे असे अकाली जाणे मनाला चटका लावणारे आणि न पटणारे आहे. अजितदादा तुम्ही खूप लवकर गेलात. तुम्ही कायम मनात राहाल. दादांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.”
राहुल वैद्यने शेअर केलेल्या व्हिडीओत अजित पवार राहुल वैद्यबरोबर गाणं गाताना आणि त्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. कडक शिस्तीचे आणि फटकळ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांना गाणी ऐकण्याची आवड होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या सांगितिक कार्यक्रमांना त्यांची अनेकदा उपस्थिती असायची, अशी आठवण पत्रकार सांगतात.
पाहा व्हिडीओ:
अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हाने
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (३० जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवार यांना बसविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि विधिमंडळ पक्षनेत्याचा निर्णय तात्काळ घ्यायचा असल्याचे दिसते.
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दर्शविला असून शनिवारी (३१ जानेवारी) त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होऊ शकते. त्यानंतर सायंकाळीच त्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

