Actor opens up on leaving India for Dubai: साऊथचे सुपरस्टार म्हणून अभिनेते अजित कुमार यांची ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण, ते अभिनय क्षेत्रात काम करतात असे नाही. त्यांची मोटर स्पोर्ट्समध्ये रेसर म्हणूनही ओळख आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही क्षेत्रात त्यांनी संतुलन ठेवले आहे. दोन्ही करिअरमध्ये ते यशस्वी आहेत. त्यांच्या मेहनतीने त्यांनी हे यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे.
अजित कुमार यांनी नुकतीच अनुपमा चोप्रा यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या मदतीसाठी ते त्यांची टीम का नाही आणि प्रत्येक काम ते स्वत: करण्यावर का भर देतात असा प्रश्न विचारला.
“सातव्या-आठव्या वर्षी आम्हाला…”
यावर अजित कुमार म्हणाले, “पण, हे सगळेच करतात, असे नाही. माझा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला आहे. माझे पालक कायमच काळाच्या पुढे होते. ते पुढचा विचार करत असत. आम्ही आमची कामे स्वत: केली पाहिजेत, अशा वातावरणात वाढलो. माझ्या पालकांनी माझी कामे मला करण्याची सवय लावली. सातव्या-आठव्या वर्षी आम्हाला जेवण बनवता येत होते.”
जे कलाकार त्यांच्या मदतीसाठी इतर लोकांची मदत घेतात, त्यांची टीम असते. यावर मत व्यक्त करत अभिनेता म्हणाला, “काही कलाकार इतरांची मदत घेतात, मी हे समजू शकतो. यामुळे त्यांचे आयुष्य सोपे होते. त्यांनी विविध ठिकाणी कमिटमेंट केलेली असते.त्यामुळे ते वेळ वाचविण्यासाठी इतराची मदत घेतात. मला वाटत नाही की त्यामध्ये काही चुकीचे आहे. मी या सगळ्यापासून दूर आहे. याचे कारण म्हणजे त्यामुळे माझ्या चांगल्या सवयी बिघडू शकतात. सुरुवातीला, तुम्हाला मदत करणारे लोक तुमच्याभोवती असतात. पण, त्यानंतर तुम्ही सगळ्यांकडून तशीच अपेक्षा करता. अशा काही गोष्टी मी भूतकाळात केल्या आहेत आणि मला त्याची लाज वाटते.”
अभिनेत्याने खुलासा केला की त्यांना प्रसिद्धीझोतात येणे आवडत नाही. दंगा आवडत नाही. स्वत:ची कामे स्वत: करण्यावर ते का भर देतात, याचा खुलासा करत अभिनेते म्हणाले, “मी याच कारणामुळे दुबईला राहण्यासाठी गेलो आहे. या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी इथे प्रामुख्याने मोटार स्पोर्ट्ससाठी येतो. त्याची मला मदत होते. मी दररोज माझी कामे मी करतो आणि मला ते खूप आवडते.”
अजित कुमार पुढे म्हणाले, “जर तुम्ही मला २० वर्षांपूर्वी भेटला असता तर तुम्ही माझा तिरस्कार केला असता. मी वाईट होतो किंवा माझ्या सवयी बिघडल्या होत्या असे नाही. पण, माझी कामे करण्यासाठी लोक असत. त्यामुळे तुमचे आयुष्य सोपे राहत नाही. जितके लोक तुमच्या अवती भोवती असतात, तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला गोष्टी सांभाळाव्या लागतात.”
“मला असे वाटत होते की मी त्यांच्यातील रोजची भांडणे सोडवण्यात बराच वेळ वाया घालवत आहे. जे लोक तुमची काळजी घेऊ शकतात, त्याची मदत तुम्ही घेऊ शकता. पण काळ पुढे जाईल तसे तुम्हाला जाणवते की तुम्ही त्यांच्यासाठीसुद्धा खूप गोष्टी करत आगात. त्यामुळे भावनिक भार वाढतो.म्हणून मला वाटते की जितके शक्य असेल तितके स्वतंत्र राहणे चांगले आहे.”
