दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली-द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली-द कन्क्लूजन’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. चित्रपटानंतर यातील कलाकारांनाही भरभरुन प्रसिद्धी मिळाली. यानंतर आता ‘विवेगम’ हा तामिळ चित्रपट बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडतोय. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी या चित्रपटाने जगभरात १५२ कोटी रुपयांची कमाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त ३ ते ४ दिवसांतच ‘विवेगम’ने १०० कोटींचा गल्ला जमवला. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’च्या कमाईला आता ‘विवेगम’ टक्कर देतोय.

‘विवेगम’ने आतापर्यंत चेन्नईमध्ये ८.५० कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘बाहुबली २’ने चेन्नईत फक्त ८.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत ‘बाहुबली २’ने ३.२४ कोटी रुपये कमावले होते. तर ‘विवेगम’ने तीन दिवसांत ४.२८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. केवळ भारतातच नाही तर जगभरातही हा चित्रपट चांगली कमाई करतोय.

‘विवेगम’मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार अजित कुमार मुख्य भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यामध्ये खलनायकाची भूमिका साकारतोय. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसनचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे बजेट १०० कोटींचे आहे. शिवा दिग्दर्शित हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी जगभरातील तीन हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला.

वाचा : महिला आयोगाने कंगनाचे आरोप फेटाळले

या चित्रपटाची कथा एका इंटरपोल अधिकाऱ्याशी निगडीत आहे. या अधिकाऱ्याची भूमिका अजित कुमार साकारत आहे. आजकाल बहुतांश चित्रपटातील स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्सचं काम परदेशातील तंत्रज्ञांकडे सोपवलं जातं. मात्र ‘विवेगम’च्या दिग्दर्शकाने असं न करता चेन्नईतीलच तंत्रज्ञांकडून हे काम करुन घेतलं.